ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परस्थितीवर परखड मत व्यक्त केलं आहे. खोके देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर विकत घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही राजकीय संस्कृती नसते, असंही ते म्हणाले आहेत.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सबनीस यांनी, “उघडपणे जनता विकली जात आहे, जनतेचे प्रतिनिधी विकले जात आहेत. आणि हे सार्वत्रिक ६०-६०,५०-५०, ४०-४० अशा प्रकारच्या खोक्यांनी जर विकत घेतले जात असतील. तर याला कसली संस्कृती म्हणायची? विकत घेणाऱ्यांना संस्कृती नाही आणि विकत देणाऱ्यालाही संस्कृती नसते.” असं परखड भाष्य केलं.
या अगोदरही राज्यात जेव्हा मशीदींवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण पेटलं होतं, तेव्हाही श्रीपाल सबनीस यांनी मत व्यक्त केलं होतं. “भोंग्याच्या आवाजापेक्षा संविधांनाचा आवाज मला पवित्र वाटतो. भोंग्याच्या राजकारणामध्ये देवाला अडकवून नका आणि धर्माला बदनाम करु नका. संविधानाची वाटणी आणि फाळणी करु नका. हे आपल्या देशाला परवडणारे नाही.” असे ते म्हणाले होते.