गेल्या पंधरवडय़ापासून अतिवृष्टीला सामोरे जात असलेल्या विदर्भातील पिकांच्या हानीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे एक पथक येणार असून, वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर धरल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिष्टाईमुळे आता केंद्राकडून विदर्भाला जादा मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पश्चिम विदर्भातील काही जिल्हे वगळता विदर्भातील सर्व जिल्हय़ांत गेल्या १५ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे अनेक जिल्हय़ांमध्ये पावसाची सरासरी आताच पूर्ण केली आहे. आणखी दोन महिने असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त होत असल्याने विदर्भातील शेतकरी अस्वस्थ आहे. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विदर्भातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याची दखल घेत अतिवृष्टीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच बाधित कुटुंबांसाठी सुमारे १९०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. हे पॅकेजसुद्धा पुरेसे नाही, अशी भावना आमदारांनी बोलून दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विधिमंडळात दिले होते.
विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे एक पथक येणार असल्याची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. अतिवृष्टीमुळे विदर्भातील खरिपाचा हंगाम जवळजवळ बुडाल्यात जमा आहे. अनेक भागांत पूर आल्याने शेतीची जमीन खरडून गेली आहे. शेतातील पिकेसुद्धा वाहून गेली आहेत. विदर्भात धान, कापूस व सोयाबीन ही तीन मुख्य पिके या हंगामात घेतली जातात. महसूल व कृषी खात्याने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात जवळजवळ प्रत्येक जिल्हय़ात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पीक वाहून गेले असल्याची नोंद केली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली मदत खूपच अपुरी आहे. त्यामुळे आता केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला आहे. केंद्राच्या पाहणी पथकाचा दौरा लक्षात घेऊन अमरावती व नागपूर विभागाच्या आयुक्तांनी सर्व जिल्हय़ांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीचे प्रस्ताव तातडीने मागवले आहेत.

विदर्भ आंदोलनाची पाश्र्वभूमी
काँग्रेसने नुकतीच वेगळ्या तेलंगण राज्याला मंजुरी दिल्याने वेगळ्या विदर्भाच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ओला दुष्काळसदृश्य स्थिती असल्यामुळे आधीच विदर्भातील जनभावना तीव्र आहे. यात स्वतंत्र राज्याच्या मागणीची भर पडल्याने हा मुद्दा आणखी पेटू शकतो हे लक्षात आल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्राचे पथक येत्या तीन-चार दिवसांत विदर्भात येईल, अशी माहिती काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनीही केंद्राचे पथक येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. केंद्राकडून भरघोस मदत मिळवून देत स्वतंत्र विदर्भाची मागणी बाजूला सारण्याचे डावपेच काँग्रेसकडून आखले जात असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Story img Loader