राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह आणि पक्षनाव अजित पवार गटाकडे गेल्याने शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी झाली असून, आगामी निवडणुकीत घड्याळ चिन्ह अजित पवार गट वापरू शकणार आहे. तर, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवार गटासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. असे निर्देश देत असताना सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला त्यांच्या चिन्हाखाली एक टिप्पणीही लिहायला सांगितली आहे. यावरून रोहित पवार गटाने अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे”, अशी सूचना अजित पवार गटाने त्यांच्या चिन्हाखाली लिहिली आहे.

हेही वाचा >> “आता आम्हीच खरी माहिती जनतेसमोर आणतो”, शरद पवार गटाची सविस्तर पोस्ट; सर्वोच्च न्यायालयाचा केला उल्लेख!

या सूचनेवरून रोहित पवारांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, “या निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढे वापरता येईल, अन्यथा घड्याळ तर जाईलच पण वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय. राजकारणाला अशा अटी लागू होत असतील तर याचं दुःख वाटतं. पण विचार बदलल्यामुळे आणि ज्याचं राजकारणच विरोधी पक्षाला संपवण्याच्या अटीवर चालतं त्यांच्यासोबत गेल्याने ही वेळ आली, हे नाकारता येणार नाही!”

सर्वोच्च न्यायालयाचा नेमका निकाल काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. शरद पवार गटानं यासंदर्भात केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आधी अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह वापरण्याचा सल्ला दिला होता. नंतर मात्र एकीकडे शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकांपर्यंत तुतारी चिन्ह वापरण्याची परवानही देतानाच घड्याळ हे चिन्ह वापरण्यासाठी अजित पवार गटाला परवानगी देण्यात आली. या परवानगीसाठी न्यायालयाने अटी घालण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The clock will pass but the time rohit pawars criticism of ajit pawar over ncp symbol sgk