करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेनं देशाची अवस्था बिकट करून ठेवल्याची स्थिती सगळीकडे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासह मूलभुत आरोग्य सुविधांअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागले. भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारवर टीका होत आहे. जगभरात पसरलेल्या करोना महामारीचा कोणत्या नेतृत्वाने नीट मुकाबला केला. यासंदर्भात ‘द कॉन्व्हर्सेशन’ या वेबसाईटने एक जनमत चाचणी घेतली होती. या चाचणीत निघालेल्या निष्कर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल अमेरिकेमधील ‘द कॉनव्हर्सेशन’ या वेबसाईटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली होती. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. या ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनमत चाचणीतील समोर आलेल्या कलावरून राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

“अमेरिकेतील ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. करोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली. काही दिवसांपूर्वी ‘द डेली गार्डियन’ या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपाने केला. त्या तुलनेत ‘द कॉन्व्हर्सेशन’ हे वृत्तपत्र मोठं आहे. त्यामुळे दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा!,” असं म्हणत “करोना महामारी निंदनीय कामगिरी पंतप्रधान मोदी जगात भारी” असं टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डागलं आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा : Coronavirus: सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण?; मोदींना मिळाली ९० टक्के मतं

जनमत चाचणीमध्ये मोदींना किती मतं मिळाली?

करोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भात ‘सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ७५ हजार ४५० जणांनी आपली मतं नोंदवली. त्यापैकी सर्वाधिक मतं म्हणजेच ९० टक्के मतं ही मोदींना मिळाली. म्हणजेच ७५ हजार ४५० जणांपैकी ६७ हजार ९०५ जणांनी मोदी हे जगामध्ये करोना परिस्थिती हाताळ्यात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते असल्याचं मतं मांडलं आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ५ टक्के तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना ३.७ टक्के मतं मिळाली आहेत. मॅक्सिकोच्या अ‍ॅमलो यांना या पोलमध्ये १.३ टक्के मतं मिळाली आहेत.

Story img Loader