विवाह करण्याच्या आणाभाका घेऊन एकमेकांवर प्रेम करीत असताना प्रियकराने अचानकपणे पवित्रा बदलून लग्नास नकार दिला. तेव्हा मानसिक धक्का बसलेल्या प्रेयसीने धाडस दाखवून थेट पोलीस ठाणे गाठून दाद मागितली. पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित प्रियकरास बोलावून चौकशी केली. आंतरजातीय विवाहाला घरच्या मंडळींचा विरोध असल्याचे कारण पुढे आले. मात्र प्रियकर व त्याच्या घरच्या मंडळींचे समूपदेशन झाले आणि मग लगेचच पोलीस ठाण्यातच प्रियकर व प्रेयसी दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात ही घटना घडली. त्याचे शिल्पकार ठरले पोलीस निरीक्षक प्रदीप काळे.
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात राहणारा सचिन हा बांधकामावर गवंडी म्हणून काम करतो. त्याच गावात राहणारी यल्लव्वा ही देखील बांधकामावर बिगारी म्हणून मजुरी करते. बांधकाम करीत असताना सचिन व यल्लव्वा यांचे प्रेम जुळले. दोघांनीही लग्न करण्याची शपथ घेतली होती. परंतु नंतर दिवसांमागून दिवस सरत असताना यल्लव्वा ही लग्नासाठी तगादा लावू लागली. तर, सचिन याने पवित्रा बदलून लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे धक्का बसलेल्या यल्लव्वा हिने हिंमत दाखवून थेट अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांची भेट घेऊन दाद मागितली असता प्रियकर सचिन यास पोलिसांनी बोलावून घेतले. त्याला जाब विचारला असता त्याने, आपण लग्नाला तयार आहोत. परंतु हे लग्न आंतरजातीय होणार असल्यामुळे घरच्या मंडळींचा विरोध असल्याचे सचिन याने सांगितले. त्यावर पोलीस निरीक्षक काळे यांनी त्यांचे समुपदेशन केले आणि विवाहासाठी तयार केले.
सचिन लग्नाला तयार झाल्यानंतर पोलीस निरीक्षक काळे यांनी पोलीस ठाण्यातच झटपट विवाह लावण्याचा निर्णय घेतला. लगोलग लग्नाची तयारी झाली. सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, पैठणी, साडी, नवरदेवालाही पोशाख, बूट तसेच संसारासाठी भांडी आदी सर्व साहित्य जमा झाले. भटजीही आले. नवरा-नवरीला मुंडावळ्या बांधल्या. मुलीचे कन्यादान स्वत: पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनीच केले. अन् भोजनानंतर दोघा वधुवरास खास वाहनातून त्यांच्या गावी मैंदर्गीला पाठविण्यात आले.