सांगलीतील गणपती पंचायतन संस्थानच्या  चोर गणपतीचे रविवारी  पहाटे आगमन झाले. भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होत असताना मंदिरामध्ये तत्पुर्वीच या गणेशाचे आगमन होत असल्याने या गणपतीला चोर गणपती असे  म्हटले जाते.भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणार्‍या या चोर गणपतीला २०० वर्षांची परंपरा आहे. पंचायतन संस्थानच्या गणेशाची  प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या चार दिवस अगोदर प्रतिष्ठापना होते. चोर गणपती केव्हा आला अन् गेला याचा गणपती भयत, भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या विघ्नहर्त्याला चोर गणपती म्हणण्याची प्रथा रूढ झाल्याची आख्यायिका आहे.  

साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तीची स्थापना केली जाते. दरवर्षी रंगरगोटीशिवाय मूर्तीना हात लावला जात नाही. गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात.

करोना  संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मागील  दोन वर्षांमध्ये साध्या पध्दतीने गणपती पंचायतन संस्थान कडून गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र  मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे.यासाठी मंदिर,मुख्य गाभार्‍यात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Story img Loader