बेकायदेशीर मालमत्तांची चौकशी करण्याकरता ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरी आज (१८ जानेवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा छापे मारले. गेल्या दीड वर्षांपासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. १३ जानेवारी रोजीच राजन साळवी रायगड लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात कुटुंबासह चौकशीकरता गेले होते. परंतु, आता यापुढे एसीबीला सहकार्य करणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, आज पुन्हा एसीबीने त्यांच्या घरी धाड मारली असून सकाळपासून त्यांच्या घरी चौकशी सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पावलं कुठे पडतात हे मला समजतं. त्यामुळे ते माझ्याकडे येणार आहेत, हे मला माहित होतं. ते रत्नागिरीतील अल्पायशी हॉटेलमध्ये उतरले होते. तिथून ते माझ्याकडे येणार असल्याचं मला माझ्या विश्वासूंनी सांगितलं होतं”, अशी माहिती राजन साळवी यांनी आज माध्यमांना दिली.

हेही वाचा >> सूरज चव्हाण यांना अटक; आदित्य ठाकरे सोशल पोस्टमध्ये म्हणतात, “अशा व्यक्तीचा सहकारी…!”

ते पुढे म्हणाले की, ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर राहिलो त्या दिवसापासून मी माझी मानसिकता केली होती की मला भविष्यात त्रास होणार. तो त्रास त्यांनी द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडे अटक वॉरंट असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नाही. आतापर्यंत माझ्या भावाची, त्याच्या पत्नीची, त्याची मुलं, माझी पत्नी, माझी दोन मुलं आणि व्यवसायासंबंधात चौकशी केली. आतापर्यंत मी एसीबी कार्यालयात सहा वेळा जाऊन सहकार्य केलं. मला माहित होतं ही मंडळी माझ्या घरापर्यंत येणार आहेत.

वरिष्ठ लवकरच संपर्क साधतील

“माझे वरिष्ठ मला संपर्क साधतील. कार्यकर्ते, मतदार संपर्क साधतील. उद्धव ठाकरे आणि शिवसेना माझ्या पाठीशी आहे. पक्षावर माझा संपूर्ण विश्वास आहे. शिवसेना पक्ष म्हणून आम्ही ठाकरेंबरोबर राहिल्याने आम्हाला त्रास दिला जात आहे. राजन साळवी ही व्यक्ती काय आहे, कशी आहे, हे माझ्या कुटुंबाला, जनतेला आणि पक्षाला माहिती आहे. माझे मतदार माझ्या पाठिशी आहेत, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

मी सयंमी आहे

“मी अत्यंत संयमी आणि शांत आहे. मी स्वतः काय आहे ते जनतेला माहितेय. त्यांनी गुन्हा दाखल केलाय असं वाटतंय. पण मला माहीत नाही”, असंही राजन साळवी म्हणाले.

कुठे कुठे पडले छापे

राजन साळवी यांच्या एकूण चार मालमत्तांवर एसीबीचे एकाचवेळी छापे पडले आहेत. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, माझ्या घरी, माझ्या लहान भावाच्या घरी, माझ्या जुन्या घरी आणि माझं लहान हॉटेल आहे, तिथेही छापे पडले आहेत.

रत्नागिरीत त्यांच्या पावलांची खबर मिळते

“मला ज्या दिवशी एक-दीड वर्षापूर्वी नोटीस आली तेव्हाच मला वाटलं की हे माझ्यामागे ससेमिरा लावणार. त्यांच्या पावलांची खबर मला मिळत असते. रत्नागिरी तालुका, जिल्ह्यातील माणसं माझी आहेत. कालपासून मला फोन येत होते. मला माहिती आहे की, रत्नागिरीच्या अल्प हॉटेलमध्ये हे अधिकारी थांबले आहेत, ते माझ्या घरी येणार आहेत. हे मला माहीत होतं”, असंही ते म्हणाले.

“गुन्हा दाखल झाला तर हे मला घेऊन जातील. त्यांची कारवाई ते करतील. मी दोषी आढळलो तर मी तुरुंगात जायलाही तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंच्या गटातील निष्ठावान आमदार आहे, त्यामुळे मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The day i joined shiv sena with uddhav balasaheb thackeray rajan salvis first reaction after acb raids sgk