महाराष्ट्रात कृषी हवामाननिहाय ९ अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय कृषी हवामान विभागनिहाय अभ्यास गटाच्या वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात हापूस आंब्यासाठी स्वतंत्र प्रयोग शाळा व्हावी, अशी शिफारस करण्यात आली.
कृषी हवामान विभागनिहाय अभ्यास गटाची तिसरी सभा दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांदे यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात घेण्यात आली.
या वेळी दापोली कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. एच. के. पाटील, संशोधन संचालक डॉ. यू. व्ही. महाडकर, विभागीय कृषी महासंचालक व्ही. बी. इंगळे, जिल्हा कृषी अधीक्षक मोहन आटोळे, सहयोगी संचालक डॉ. बी. आर. साळवी आदी उपस्थित होते.
राज्यात हवामानानुसार कृषी योजना राबविण्यासाठी ९ अभ्यास गटांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जांभ्या जमिनीच्या अतिपर्जन्यवृष्टीचा प्रदेश (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), बिनजांभ्या जमिनीचा अतिपर्जन्यवृष्टीचा प्रदेश (ठाणे, रायगड), घाटमाथ्याचा प्रदेश (ठाणे), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे तीन हवामान विभाग करण्यात आले.
या अभ्यास गटाच्या यापूर्वी दोन सभा झाल्या. आता २५ जूनपूर्वी एक सभा होऊन चारही सभांमध्ये झालेल्या शिफारशींना अंतिम स्वरूप देऊन पुढील १५ वर्षांसाठी शिफारशी करण्यात येणार आहेत, असे विभागीय कृषी सहसंचालक व्ही. बी. इंगळे यांनी सांगितले.
बदलत्या हवामानाला संपूर्ण राज्यात कृषी शेती परवडत नसल्याने हवामानाचा अभ्यास करून शेती पद्धती कशी असावी. जलसंवर्धन व वापर, त्यांचे निकष, पीकविमा संरक्षण, प्रक्रिया उद्योगाचे धोरण, नुकसानभरपाई, कृषी पर्यटन, कृषी संशोधन याबाबत शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी ही सभा होती.
शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. त्यांना लवकरच स्वरूप देण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा