राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच आहे असा निकाल निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला. त्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नवं नावही मिळालं आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निकालावरुन होणारी टीका तसंच आरोपांच्या फैरी या सुरुच आहेत. रोहित पवार यांनी तुम्ही पक्ष चोरलात, चिन्ह चोरलंत तरीही बापमाणूस आमच्याकडे आहे ते म्हणजे शरद पवार अशी प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर दिली. त्यानंतर छगन भुजबळ यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा दिवार सिनेमातल्या एका प्रसंगाची आठवण करुन देत त्यांनी उत्तर दिलं आहे. ज्या उत्तराची चर्चा होते आहे.
दिवार सिनेमातला तो प्रसंग काय?
अमिताभ बच्चन (विजय) आणि शशी कपूर (रवि) हे दोघेही भाऊ. विजय आणि रवि हे सिनेमात वेगळ्या वाटा निवडतात. विजय स्मगलर होतो आणि रवि पोलीस अधिकारी. या दोघांचा एक अजरामर प्रसंग आहे. ज्यात विजय आयुष्याचं तत्त्वज्ञान रविला शिकवतो. तो म्हणतो तुझ्या आदर्शांनी तुला काय मिळालं? “आज मेरे पास बिल्डिंगे हैं, बंगला है, गाडी है प्रॉपर्टी है… क्या है तुम्हारे पास?” त्यावर रवि उत्तर देतो “मेरे पास माँ है.” रोहित पवारांची प्रतिक्रिया जेव्हा छगन भुजबळांना सांगण्यात आली तेव्हा त्यांना याच अजरामर प्रसंगाची आठवण झाली.
हे पण वाचा- १६ नोव्हेंबरला राजीनामा का दिला? छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं; म्हणाले, “कमरेत लाथा घालण्याची भाषा..”
छगन भुजबळ काय म्हणाले?
शरद पवारांकडून जरी चिन्ह आणि पक्ष काढून घेतलं तरीही नव्या नावासह आम्ही परत आलो आहोत. रोहित पवार म्हणाले की आमच्याकडे शरद पवार आहेत. त्यावर काय सांगाल? असं विचारलं असता भुजबळ म्हणाले, “मला एक सिनेमा आठवतो. आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन म्हणाले असते तुम्हारे पास क्या है? हमारे पास गाडीयाँ है, मंत्री है, हमारे पास सरकार है, सत्ता है हमारे पास, पार्टी है हमारे पास चिन्ह है हमारे पास, तुम्हारे पास क्या है? तर शशी कपूर म्हणाले असते हमारे पास शरद पवार है.” असं म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. यातली गंमत समजून घ्या. रोहित पवार म्हणत आहेत की तुम्ही सगळं घेतलंत आमच्याकडे शरद पवार आहेत म्हणून मी हे म्हणतोय असंही पुढे भुजबळ म्हणाले. त्यांनी आज रोहित पवारांच्या वक्तव्याची ‘दिवार’चा संवाद म्हणून दाखवला. ज्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.