वाई : किल्ले वर्धनगड (ता कोरेगाव) येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या दर्गा परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम आज पहाटे पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवकालीन असलेला दर्गा काही समाजकंटकांनी काही दिवसापूर्वी पाडला होता. परंतु बांधते वेळी या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे मनसेचे कार्यकर्त्यांनी वनविभागाला कळवून हे वाढीव अतिक्रमण काढावे अन्यथा हनुमान मंदिराला परवानगी द्यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. व त्यास अनुसरून कागदपत्रानुसार त्या ठिकाणी असलेले कबर सोडून झालेले अतिक्रमण आज पोलीस प्रशासनाच्या मोठ्या पोलीस बंदोबस्तासह वनविभागाच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आले.
या अतिक्रमण काढतेवेळी कुठल्याही प्रसार माध्यमांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत दर्गा सोडून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. कुठलाही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गडावर जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते, .वर्धनगड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
वर्धनगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. हा किल्ला सातारा पंढरपूर रस्त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याचा सीमेलगत बांधलेला आहे. काही ऐतिहासिक संदर्भा नुसार या किल्ल्लयावर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक महिना वास्तव्य होते.