कराड : पुणे-बंगळुरु महामार्गावरील कराडजवळ रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी येथील उड्डाणपुलांच्या पाडकामांमुळे तासन् तास वाहतूक कोंडी होऊन दहावी व बारावीच्या परीक्षार्थींचे प्रचंड हाल होत आहेत. तरी, या परीक्षार्थींची ही गैरसोय, नुकसान टाळण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण सरसावले आहेत.
आमदार चव्हाण यांनी मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पत्रकार बैठकीत वाहतूक कोंडी निर्मूलनाच्या उपाययोजनांची माहिती दिली. चव्हाण म्हणाले, की इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी २६ मार्चपर्यंत असून, या परीक्षांमध्येच कराडजवळ महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने परीक्षार्थी व पालकांची तारांबळ उडत आहे. तरी, परीक्षेच्या आधी चार तास कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आपण संबंधित यंत्रणेसमवेत बैठका घेऊन नियोजन केले आहे. कराडजवळ महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या जाणार आहेत.
हेही वाचा >>> “राज्य सरकार स्थानिक निवडणुका टाळून लोकशाहीचा…” नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
किमान दोन मार्गिका खुल्या राहाव्यात म्हणून अवजड वाहनांना ठराविक वेळेसाठी येथून वाहतुकीस मज्जाव करण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्डे मुजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रहदारीच्या रस्त्यांवर वाहने थांबवण्यास व छोट्या व्यावसायिकांना त्यांची दुकाने लावण्यास परवानगी राहणार नाही तर वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने काही अडचण आल्यास परीक्षार्थी व पालकांनी थेट आपल्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, दहावी व बारावीच्या परीक्षार्थींच्या परीक्षा केंद्राकडे येण्याजाण्याच्या वेळेदरम्यान, लोकांनी आपली वाहने वाहतूक कोंडीच्या ठिकाणांकडे अजिबात न आणत सहकार्य करावे असेही आवाहन चव्हाण यांनी केले. कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनीही वाहतूक नियंत्रणाबाबतच्या उपाययोजनांची माहिती या वेळी दिली.