अलिबाग : ढोलताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखनाद यांच्या गजरात रायगड किल्ल्यावर ३५१वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यातून एक लाखाहून अधिक शिवभक्त आले होते.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आणि कोल्हापूरचे युवराज शहाजी राजे भोसले, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>बारामतीचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी? ११ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांचं सहावेळा ‘हे’ वक्तव्य
दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरुवात रायगड खोऱ्यातील २१ गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन गडपूजनाने केली. यानंतर शिरकाई देवी मंदिरात गोंधळ तर जगदिश्वर मंदिरात कीर्तन सोहळा झाला. यावेळी शिवभक्तांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. गुरुवारी सकाळी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले.
‘दोन हजार कोटी द्या’
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हे महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली. ते किल्ले रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान बोलत होते.