नगर जिल्ह्यातील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाविरोधात जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात चांगलेच वातावरण तापले आहे. गुरुवारी श्रीरामपूरला काँग्रेस व शेतकरी संघटनेने स्वतंत्र आंदोलने केली. संतप्त शेतक-यांनी आंदोलने केली. काँग्रेसने केलेल्या आंदोलनात हे राष्ट्रवादीचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला. काँग्रेसचे मंत्री व आमदारांची कुचंबणा करण्याचा हा डाव असल्याचा आरोप आमदार भाऊसाहेब कांबळे व माजी आमदार जयंत ससाणे यांनी केला.
जायकवाडीसाठी पाणी सोडल्याच्या निषेधार्थ आमदार कांबळे व ससाणे यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे विभागचे उपअभियंता सुखदेव थोरात यांना घेराव घालण्यात आला. या वेळी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, जी. के. पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, पंचायत समिती सदस्य किशोर बकाल, नगरसेवक संजय फंड, संजय छल्लारे, अंजूम शेख, श्रीनिवास बिहाणी, राजेश अलघ आदी यावेळी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, आम्ही जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना याबाबत जाब विचारला. मात्र पाणी बंद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले नाही. केवळ दिवाळी असल्याने आम्ही शांत बसलो असून पाण्यासाठी येणाऱ्या काळात यापेक्षा तिव्र आंदोलन करणार आहोत. ससाणे म्हणाले, जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विश्वासघात केला आहे. गेल्या वेळी जायकवाडीला पाणी सोडताना आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना याचे घेणे नाही. काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे.
माजी आमदार दौलतराव पवार यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी संघटनेने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. या वेळी शहरात आलेल्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला.
पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी कोणत्या लेखी आदेशाने जायकवाडीसाठी पाणी सोडले त्याची प्रत देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मात्र उपअभियंता सुखदेव थोरात यांनी लेखी आदेश आपल्याकडे नसल्याचे सांगून प्रत देण्यास असमर्थता दर्शविली. तटकरे यांनी पाणी सोडण्याचा जो लेखी आदेश दिला त्याबाबत वरिष्ठ पातळीवर माहिती मिळेल. त्याबाबतचे लेखी पत्र वरिष्ठांनी मला दिलेले नाही, असे उपअभियंता थोरात यांनी आंदोलकांना लेखी दिल्यानंतर सुमारे दोन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नेवासा राज्यमार्गावर खोकर फाटा व भोकर फाटा अशा दोन ठिकाणी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार किशोर कदम यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांची गाडी आंदोलकांनी अडविली. यांना दुस-या मार्गाने जावे लागले.
 ‘पक्षाचे राजीनामे द्या’
राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. पक्षाच्या नेत्यांचे ऐकले जात नसेल तर पक्षाचा राजीनामा द्या, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी ससाणे व कांबळे यांच्याकडे केली. पण त्यांनी राजीनाम्यासंबंधी मौन बाळगले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा