PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024 : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिपदात स्थान मिळणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्याकरता भाजपा पक्षनेतृत्त्वाकडून रक्षा खडसे यांना आज फोन आला होता. त्यानुसार, त्या आज शपथविधीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही दिल्लीत दाखल होणार आहेत. दरम्यान, सूनेला मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दाटलेल्या कंठातून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“रक्षा खडसे केंद्रीय मंत्री होत असल्याचा मनस्वी आनंद आमच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना आहे. मला वाटतं की गेले अनेक वर्षे भाजपात काम करत असताना त्या कामाचं श्रेय आणि रक्षा खडसेंनी भाजपावर ठेवलेली निष्ठा याचं फळ म्हणून तिला आज शपथविधीसाठी बोलावण्यात आलं आहे. साऱ्यांचेच आशीर्वाद आमच्या परिवाराच्या पाठीशी आहेत. खासकरून तिसऱ्यांदा तिला संधी दिली, याबद्दल मतदारांचे आभार. मतदारांमुळेच दिल्लीपर्यंत आणि मंत्रिपदापर्यंत जाण्याची संधी मिळीली”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, रक्षा खडसेंबरोबर तुम्हीही दिल्लीला जाणार का? असं विचारल्यावर ते म्हणाले की, “मीही दिल्लीला जाणार आहे. दुपारी ३ वाजता मी दिल्लीला जाण्यासाठी निघेन.” तिसऱ्यांदा खासदार झालेल्या सूनेचं कौतुक याची देही याची डोळा पाहण्यासाठी ते दिल्लीला रवाना होणार आहेत.

हेही वाचा >> Narendra Modi Swearing-in Ceremony Updates : मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात दिसणार महाराष्ट्रातील ‘ही’ महिला खासदार; शपथविधीसाठी पक्षनेतृत्वाचा फोन, म्हणाल्या…

नव्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या महिला मंत्री

उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच एक महिला मंत्री मिळाल्या आहेत, याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला मंत्री आहेतच, शिवाय महाराष्ट्रातूनही त्यांची (नव्या मंत्रिमंडळा) पहिली महिला म्हणून निवड करण्यात आली आहे. म्हणजेच नव्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील महिला मंत्री म्हणून रक्षाताईंचं नाव आलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्री या नात्याने त्यांनी महाराष्ट्राला आणि जळगावला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.

एवढा आनंद कधीच झाला नव्हता

दरम्यान, रक्षा खडसेंचं कौतुक करताना एकनाथ खडसे यांचे डोळे पाणावले होते. कंठ दाटून आला होता. याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले, “रक्षाताईंना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावण्यात आलं, त्यातच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला अश्रू आवरता आले नाहीत. इतका आनंद माझ्या जीवनात कधीही झाला नव्हता. केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेणं ही आयुष्यातील सर्वांत मोठी गोष्ट आहे.”

हेही वाचा >> PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

जनतेमुळेच मी निवडून आले

रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी खडसे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून फोन आल्याची चर्चा आहे. यावर खडसे यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीतील विजयाचं आणि या यशाचं श्रेय जनतेला द्यावं लागेल. कारण जनतेमुळेच मी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहे. यासह आमच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानते, त्यांच्या योगदानामुळे मी निवडून आले आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fathers eyes teared up when daughter got the chance to become a minister when raksha khadse received the invitation eknath khadse said sgk