सातारा येथील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकाम महिनाभरात तर अंतर्गत सजावट पूर्णपणे राहिली असून, सातारकरांसाठी हे वस्तुसंग्रहालय कधी खुले होणार हा प्रश्नच आहे.
या वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीच्या कामाचा ठेका पुणे येथील एव्हरेस्ट कंपनीला ६ कोटी १९ लाख २० हजार रुपयात दिला होता. हे काम दोन वर्षांत पूर्ण करायचे होते. प्रशासकीय दिरंगाई तसेच तांत्रिक अडचणींमुळे हे काम पाच वर्षांवर रखडले. सध्या चारपैकी केवळ एक बुरूज पूर्ण झाला असून, तीन बुरुजांचे प्लॅस्टर तसेच रंगवण्याचे काम राहिले आहे. या संग्रहालयाला ८० खिडक्या आहेत. त्या खिडक्यांची कामे, रेिलगची कामे अपूर्ण आहेत, तर मुख्य दारापुढच्या कमानीचे काम राहिले आहे. हे काम दोन महिन्यांत पूर्ण करणार असे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले.
यापुढे इमारत बांधल्यावर एव्हरेस्ट कंपनी ती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सुपूर्द करणार. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते ही इमारत पुरातत्त्व विभागाकडे देणार आहे त्यानंतर अंतर्गत सजावटीसाठी कोल्हापूर यथील गजबर असोसिएट यांच्याकडे ही इमारत पुरातत्त्व खाते सुपूर्द करणार आहे. त्यानंतर गजबर त्याची अंतर्गत सजावट करतील. या सजावटीसाठी १२ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यात प्रकाशयोजना, व्यासपीठ, तसेच एकूण १४ दालनांचे सुशोभीकरण करायचे आहे. याबाबत गजबर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना केल्या आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने अगोदरच झालेल्या दिरंगाईचे कारण देत तसेच सूचनांमध्ये असणारे पाडापाडीचे काम विचारात घेऊन त्याला लाल कंदील दाखवला. खरेतर २००७ सालात हा प्रकल्प मंजूर झाला. त्यानंतर दोन वर्षांत पूर्ण होणारा हा प्रकल्प पाच वर्षे झाले तरी पूर्ण झाला नाही. तो कधी पूर्ण होणार याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.