रेवदंडापाठोपाठ आता अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरही महाकाय मृत मासा आढळून आला आहे. १५ ते २० फूट लांबीचा हा मासा आज सकाळी आढळून आला. कुजलेल्या अवस्थेत असल्याने या वेळी सर्वत्र दरुगधी पसरली होती. कोकण किनारपट्टीवर महाकाय मासे वाहून येण्याचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी रेवदंडा येथील समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेतील महाकाय ब्लू व्हेल जातीचा मासा वाहून आला होता. जखमी अवस्थेतील ४० ते ४५ फूट लांबीचा हा मासा समुद्रात लोटण्यात अपयश आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा १५ ते २० फूट लांबीचा महाकाय मासा मृतावस्थेत आढळून आला. हा मासा भरतीच्या पाण्यासोबत किनाऱ्यावर वाहून आल्याचे सकाळी लक्षात आले. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर आलेला हा मोठा मासा पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने या वेळी सर्वत्र दरुगधी पसरली होती. यानंतर नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या माशाला किनाऱ्यावरच खड्डा खोदून पुरण्यात आले. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्य़ातील समुद्रकिनाऱ्यावर महाकाय मृत मासे वाहून येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षांपूर्वी मुरुड समुद्रकिनाऱ्यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळला होता. यानंतर उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर व्हेल प्रजातीचा मासा आढळला, महिन्याभरापुर्वी रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर ब्लू व्हेल जखमी अवस्थेत आढळून आला आणि आता अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरही आढळून आलेल्या मासा हा व्हेल प्रजातीचाच असल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The giant fish found dead on the alibag beach