लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : कंपनीच्या नावाने बनावट ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात जास्त नफ्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार अलीकडे वाढत आहेत. यात सोलापुरातील एका शासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस हवालदाराचीही मोठी फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार शासकीय अधिकारी असलेले शंकर नाना सातपुते (वय ३४, रा. राजेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांना ७३ लाख ८८ हजार १६२ रुपयांस गंडविण्यात आले आहे. तर सोलापूर शहरातील अशोक विठ्ठल साळुंखे (वय ४०, रा. उद्धव नगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर) या पोलीस हवालदाराची ह्याच माध्यमातून ३१ लाख ११ हजार १०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>रायगड : आमदार थोरवेंच्या सुरक्षा रक्षकावर मारहाणीचा आरोप.. थोरवे यांच्याकडून आरोपांचे खंडन

शंकर सातपुते यांना गेल्या १३ जून ते १२ जुलै या कालावधीत वेळापूर येथे अज्ञात भामट्याने तीन वेगवेगळ्या भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आय आयएफएल स्ट्रॅटेजी नावाच्या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून शेअर बाजारातून पैसा गुंतविण्याचे आणि त्या माध्यमातून आयपीओ खरेदी करून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. सफाईदारपणे गोड बोलून समोरच्या भामट्याने सातपुते यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून ७३ लाख ८८ हजार १६२ रुपयांची गुंतवणूक करून घेतली. नंतर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे समजताच सातपुते यांना धक्का बसला. त्यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली.

सोलापूर शहरात सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार पोलीस हवालदार अशोक साळुंखे यांना सुनील त्रिवेदी नावाच्या भामट्याने बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून साळुंखे यांनी ३१ लाख ११ हजारांची रक्कम भरली. परंतु नंतर त्यांची फसवणूक झाली. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The government official and the police were cheated of lakhs of rupees by unknown scammers solhapur amy