सांगली: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी झालेल्या गूळ सौद्यात चिक्की गुळास क्विंटलला ५ हजार १०० रुपये उच्चांकी दर मिळाला. सांगली चेंबर्सचे अध्यक्ष अडत दुकानदार अमरसिंह देसाई यांच्या श्री पंचलिंगेश्वर या दुकानांमधील गूळ सौद्यामध्ये शेतकरी सुरेश मारुती पुणेकर (रा. निडगुंदी, ता. रायबाग, जि. बेळगाव) यांच्या अर्धा किलो पॅकिंग मधील चिक्की गुळास ५ हजार १०० रुपये प्रती क्वि़टल इतका उच्चांकी दर मिळाला.
सदरचा गूळ श्री सत्यविजय सेल्स सांगली यांनी खरेदी केला. सौद्यात दहा किलोच्या गूळ भेलीस व ३० किलोचा गूळ रवा यांना क्विंटलला किमान ३ हजार ८०० पासून ४ हजार ५०० रुपयापर्यंत दर मिळत आहे. गूळ सौद्यासाठी आडते ,व्यापारी , खरेदीदार तसेच बाजार समितीचे संचालक कडप्पा वारद ,चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, सूर्यकांत आडके ,दऱ्याप्पा बीळगे, बाजार समितीचे कर्मचारी, शेतकरी ,गूळ खरेदीदार ,आदी उपस्थित होते.
हेही वाचा… कोट्यावधींचा निधी आणल्याचे सांगणाऱ्या पालकमंत्री खाडेंनी पदयात्रा रस्त्याची अवस्था पाहवी – वनमोरे
सांगली बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गूळ विक्रीसाठी सौद्यात आणावा असे आवाहन बाजार समिती सांगलीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी केले.