सातारा : राष्ट्रवादी गौरव रथयात्रेच्या माध्यमातून राज्याच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या महाविभूतींचा परिचय नव्या पिढीसमोर येणार आहे, तसेच यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा, यासाठी आग्रही असून, त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
संयुक्त महाराष्ट्र स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण राज्यात महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढण्यात आली असून, त्याचे स्वागत शिवतीर्थ पोवई नाका येथे करण्यात आले. येथे रथयात्रा आल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर मकरंद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मकरंद पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव चार मे पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सहा विभागांमधून गौरवयात्रांनी मुंबईच्या दिशेने प्रयाण केले आहे. १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर १ मे १९६० साली महाराष्ट्राची निर्मिती झाली. या दिवशी साताऱ्याचे सुपुत्र तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले. या गोष्टीला ६५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक मे ते चार मे पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील नामवंतांचा सन्मान, माजी मुख्यमंत्र्याचा गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांची माती, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांची माती, राज्यातील सर्व नद्यांचे जल एकत्र करून त्या रथयात्रेची सुरुवात झाली आहे. कराड येथून निघालेली ही गौरवयात्रा सातारा शिवतीर्थ येथे नंतर कवठे (ता. वाई) येथे किसन वीर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव स्मारक स्थळी (ता. खंडाळा) दाखल झाली. यानंतर लोणंद येथे गौरवयात्रेचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यानंतर फलटण येथेही आमदार सचिन पाटील सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, डी. के. पवार व कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस लतिफ चौधरी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संजय देसाई, प्रदीप विधाते, प्रमोद -शिंदे, राजेंद्र राजपुरे, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.