बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषणातून विविध मुद्दे मांडले.
“जिजाऊंचा इतिहास हा जगात पोहचला पाहिजे. जगभरातून पर्यटक सिंदखेडराजा येथे आले पाहिजेत, यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे.” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
याचबरोबर प्रसारमाध्यमांनी जन्मोत्सवाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजरेबाबत प्रतिक्रिया विचारली असता, “राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता. पण ईडी सरकारला मायबाप जनतेकरता वेळ नसून ते अन्य कामात व्यस्त असतात.”, असं म्हणत टोला लगावला.
याशिवाय, “कुणाचंही सरकार असू दे परंतु सिंदखेडराजाचा विकास ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. भले आता सरकार गेलं असेल पण पुन्हा आपलं सरकार येईल आणि पहिला मोठा उपक्रम इथे होईल. अरबी समुद्रामधील छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं? आणि सिंदेखेडराजाच्या विकासाचं काय झालं? या दोन्ही गोष्टींचा जाब आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे.”
“सिंदखेडराजाच्या विकासाची जबाबदारी नवीन पिढीने खांद्यावर घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात जे काही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते खूप दुर्दैवी आहे. आपल्याला चांगला बदल घडवावा लागणार आहे.” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं.