अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी थ्रीडी सुपरइप्मोजिशन तंत्रज्ञानाची मदत घेत एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तिची कवटी अजिंठा पोलिसांनी मुंबईला परिक्षणासाठी पाठवली आहे.

तीन महिन्यापूर्वी अजिंठा घाटात एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले होते. तीन महिने उलटून सुद्धा त्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी आज बेगमपुरा स्मशानभूमीजवळ दफन केलेल्या कबरीतून या मृतदेहाच्या सांगाड्यातील अवयव काढून घाटी रुग्णालयातील डॉक्टरांसोबत ते मुंबईला पाठवले. कबरीतून काढलेल्या मृतदेहाच्या कवटीद्वारे त्या महिलेचा चेहरा बनवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याद्वारे तिची ओळख पटण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी दिली.

शवविच्छेदनाच्या अहवालात हत्येचा प्रकार समोर आल्याने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी अजिंठा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या महिलेच्या मृतदेहाचा दफनविधी बेगमपुरा स्मशानभूमीत करण्यात आला. मात्र, या मृतदेहाची ओळख पटली नसल्यामुळे पोलिसांना तपासात अडथळे येत होते. मृतदेहाचे छायाचित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाठवून सुद्धा त्याची ओळख पटली नव्हती. परिणामी तीन महिन्यांच्या काळानंतर मृतदेहाचे अवयव काढून त्याच्याशी मिळताजुळता चेहरा बनवण्यासाठी मुंबई येथे पाठवण्यात आला आहे.

थ्रीडी सुपरइम्पोजिशन तंत्रज्ञानाद्वारे चेहरा बनवणे शक्य

छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडलेला मृतदेह, कुजलेले मृतदेह यांच्या चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी मुंबईमधील केईएम इस्पितळातील डॉ. पाठक यांच्या नेतृत्वाखाली एक समूह थ्रीडी सुपरइम्पोजिशन तंत्रज्ञानाद्वारे मृतदेहाच्या चेहऱ्याच्या मिळताजुळता चेहरा तयार करतात. त्यासाठी मृतदेहाची कवटी आमच्या टीमने काढून दिली. यासाठी मृतदेहाच्या काही विशिष्ट अवयवाची गरज या प्रणालीला लागते. यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्यासाठी मदत होत आहे. औरंगाबादमध्ये एका प्रकरणात या प्रणालीचा उपयोग झाला आहे, असे घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाचे प्रमुख तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.

Story img Loader