काळानुसार वाचनाची माध्यमे बदलली असली तरी वाचनाचे महत्त्व कमी झालेले नाही. शरीरासाठी जसा व्यायाम गरजेचा असतो तसेच मेंदूसाठी वाचन महत्त्वाचे असते असे मत अलिबाग येथील ग्रंथोत्सवात आयोजित ‘वाचनाची प्रभावी माध्यमे’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
ज्येष्ठ लेखक अनंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार शशी सावंत, ज्येष्ठ पत्रकार जयंत धुळप, संतोष बोंद्रे आणि लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांनी सहभाग घेतला.
वाचन संस्कृती, ग्रंथालये आणि वाचनाच्या बदलत्या माध्यमांवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. वाचन संस्कृती ही माणसाला जगायला शिकवते, चांगले साहित्य संस्कार घडवते, पुस्तकांशी मत्री झाली तर वैचारिक बठक तयार होते, असे मत अनंत देशमुख यांनी व्यक्त केले.
वाचनाची बदलती माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेत आहेत. छापील माध्यमांचा डिजिटल माध्यमांच्या दिशेने प्रवास सुरू आहे. येणारे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे काळानुसार बदलणाऱ्या या वाचन माध्यमांना आपण स्वीकारले पाहिजे, जगभरात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार केला पाहिजे, असे मत या वेळी जयंत धुळप यांनी स्पष्ट केले.
चांगले साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर ग्रंथालय आणि माध्यमांना लोकांपर्यंत जावे लागेल. ही काळाची गरज आहे. िवदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आपल्या कविता लोकांपर्यंत घेऊन गेले. त्यामुळे ते मोठे झाले. चांगले साहित्य ही समृद्ध जीवनाची शिदोरी आहे. त्यामुळे हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत शशी सावंत यांनी व्यक्त केले.
वाचनाची तीन माध्यमे आहेत. माहिती माध्यमे, विचार माध्यमे आणि वैकल्पिक माध्यमे आहेत. माहिती माध्यमांमध्ये वृत्तपत्र, मासिके, रेडिओ, टीव्ही आणि इंटरनेटसारख्या माध्यमांचा समावेश होतो. वैकल्पिक माध्यमांमध्ये विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या माध्यमाचा आणि नियतकालिकांचा समावेश होतो. कथा, कादंबऱ्या, ग्रंथ आणि कवितासंग्रह ही विचार माध्यमे म्हणून ओळखली जातात. काळानुसार वाचनाच्या माध्यमांची स्वरूपे बदलत गेली असली तरी त्याचे महत्त्व अबाधित असल्याचे मत हर्षद कशाळकर यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The importance of reading