सर्व विभागांना सामावून घेऊन प्रादेशिक समतोल साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नूतन प्रदेश कार्यकारिणीतून कोकणाला पूर्णत: डावलण्यात आल्याने ‘ही कसली समतोल कार्यकारिणी’ असा सवाल संतप्त कार्यकर्ते करू लागले आहेत. विशेषत: रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने यांना कार्यकारिणी निवडताना बढती देतील, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास वाटत होता. परंतु त्यांना बढती देण्याचे तर राहिले बाजूलाच, उलट त्यांच्याकडे गेली पाच-सहा वर्षे असलेले प्रदेश चिटणीसपदही काढून घेण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रदेश स्तरावरील भाजपमध्ये सुरू असलेल्या गटा-तटाच्या राजकारणाचा फटका माने यांना बसला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नूतन कार्यकारिणीच्या निवडीत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना सर्वाधिकार देण्यात आल्याने व माने हे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी गटाचे समर्थक म्हणून आवई उठविण्यात आल्याने त्यांचा बळी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत माने यांना आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त लक्ष देता यावे व गेल्या दोन निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या माने यांना विजयश्री खेचून आणता यावी, यासाठी त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.
१९९९ मध्ये बाळ माने हे विधानसभेवर प्रथम निवडून गेले. त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली. वास्तविक त्यांना पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून येथील ज्येष्ठ नेत्यांनी निकराचे प्रयत्नही केले होते. परंतु त्यांना पक्षाने तिकीट तर दिलेच, शिवाय भर पावसात झालेल्या जाहीर प्रचार सभेला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कै. प्रमोद महाजन उपस्थित राहिल्याने तसेच त्याचप्रमाणे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहिल्याने त्याचा फायदा माने यांना मिळाला व ते निवडून आले.
 २००४ व २००९च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.  यापैकी २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीने त्यांचा घात केला, तर २००९ च्या निवडणुकीत गुहागर मतदार संघात भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रामदास कदम यांच्या विरोधात केलेली बंडखोरी रत्नागिरीतील बाळ माने यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. गेल्या दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माने यांना वाऱ्यावर न सोडता पक्षाने त्यांचे पुनर्वसन करून त्यांच्या कार्याला न्याय दिला होता. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद व त्यानंतर त्यांच्याकडे प्रदेश चिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात  आली होती. या दोन्ही पदांना न्याय देताना पक्षनेतृत्वाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पडली. अशा या धडाडीच्या व समाजाच्या तळागाळातील लोकांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते जपणाऱ्या बाळ माने यांना प्रदेश कार्यकारिणीतून वगळण्यात यावे, याचेच त्यांच्या समर्थकांना आश्चर्य वाटते.

Story img Loader