मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यामुळे मनोज जरांगेंविरोधात सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. मनोज जरांगेंना कोणाचं पाठबळ आहे, याची चौकशी करा, अशा मागणीला जोर धरला होता. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला. यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार?” असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला.

“महाराष्ट्र बेचिराख करायची भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील, असा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का? यामागची भूमिका काय? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? याबाबत गांभर्याने विचार करावा लागेल. कारण, आता मराठा समाजाचीही बदनामी होतेय”, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात काय चाललंय?

“आम्ही शांततेत आणि शिस्तीत मोर्चे काढले. पण त्याला आता गालबोट लागतंय. अन्य कोणत्याही समाजाला नख न लावता मराठा समाजाचं आरक्षण आणि हित जपलं पाहिजे, अशी मागणी होती. परंतु, उपमुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरला, ऐकेरी उल्लेख केला. मानसन्मानाच्या बाबतीत फडणवीसांनी कधी ब्र काढला नाही. कायदा सुव्यवस्था, राज्य सरकार आणि भारताविरोधात फडणवीस कधी बोलत नाहीत. पण तरीही उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकण्याची भाषा केली जाते. एका मंत्र्यापासून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचलं. हे चाललंय काय?”, असा संतप्त प्रश्न शेलारांनी विचारला.

“या घटनेचा घटनाक्रम सरळ नाही. देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाल बोलले. सकाळी ९ वाजता भाजपाला एका दिवसात संपवू असं एकजण म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली. याविरोधात कटकारस्थान आहे का?” असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू, असं म्हटलं जातंय. हा कटकारस्थानाचा भाग आहे. या विषयाची गंभीर नोंद घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले. “आज या व्यक्तीला महत्त्व द्यायचं नाही. समाज आमच्याबरोबर आहे. हे सगळं घडवणारे मनोज जरांगे राहतात कुठे हे शोधलं पाहिजे. तो कारखाना कोणाचा आहे हे शोधलं पाहिजे. तिथे आलेली दगडं कोणाच्या कारखान्यातील आहेत हे शोधलं पाहिजे. या आंदोलनाला जेसीबी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले. या सगळ्यामागे एका व्यक्तीच्या समर्थनाची, पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, एका कारखान्याच्या मालकाची असेल तर एसआयटी लावा”, अशी मागणी आशिष शेलारांनी यावेळी केली.

एसटी चौकशीची मागणी मान्य

आशिष शेलारांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षानेही भूमिका मांडली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सत्ताधाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, सभागृहात गोंधळ वाढू लागल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केलं. कामकाज सुरळीत सुरू झाल्यानंतर या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The issue of maratha reservation heated up in the assembly the opposition and the ruling party face to face sit will investigate the movement sgk