राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर बीड जिल्ह्य़ात फटाके वाजवून आनंदोत्सव

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला कुस्तीत सुवर्णपदक मिळवून देणारा राहुल आवारे हा सामान्य कुटुंबातून घडलेला मल्ल. स्पर्धेत विजयी झाल्याचे वृत्त धडकताच पाटोदा शहरासह जिल्ह्यत फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला जात आहे. वडील बाळासाहेब आवारे पलवान असल्याने लहानपणापासून राहुल कुस्तीकडे आकर्षित झाला. गावच्या जत्रा-यात्रेतून पसे मिळवण्यासाठी घरची भाजी भाकरी खाऊन राहुलने फड गाजवले. वडील बाळासाहेब आवारे यांच्या जय हनुमान तालीमवरच कुटुंबाची गुजराण सुरू आहे. मागील काही वर्षांत राहुलने वेगवेगळ्या स्पर्धेत यश मिळवल्यानंतर कुटुंबाची परिस्थिती सुधारली. गरीब परिस्थितीतून आलेल्या राहुलने कुस्तीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बीड जिल्ह्यतील पाटोद्यापासून जवळ असलेल्या माळेवाडी (ता. जामखेड) येथील बाळासाहेब आवारे हे सर्वसामान्य शेतकरी. मात्र, कुस्तीचा नाद असल्याने लग्नानंतर ते पाटोदा शहरात स्थलांतरित झाले. त्यांना गोकुळ आणि राहुल ही दोन मुले. वडील पलवान असल्याने लहानपणापासून मुलांनाही कुस्तीचा नाद लागला. मात्र, परिस्थिती बेताची असल्याने खुराकासाठी लागणारा पसा नसल्याने घरची भाजी भाकरी खाऊन ते कुस्तीचा सराव करत. जत्रा आणि यात्रेतील कुस्तीस्पर्धेत पसे मिळत असल्याने राहुलने परिसरातील कुस्तींचे फड गाजवले. वडील बाळासाहेब यांनी शहरात लोकांच्या मदतीतून तालीम सुरू करुन कुटुंबाची गुजराण चालवली.

याचदरम्यान अहमदनगर येथे दरवर्षी होणाऱ्या खाशाबा जाधव कुस्तीस्पर्धेसाठी एकाचवेळी बाप-लेकांनी भाग घेतला. लहान गटातून राहुलने तर खुल्या गटातून बाळासाहेब यांनी पहिले बक्षीस मिळवले आणि एकाचवेळी कुस्तीस्पर्धेत बक्षीस मिळवणारे बाप-लेक चच्रेत आले. या स्पर्धेत राहुलने राज्यभरातील मल्लांना अक्षरश लोळवले. त्यामुळे हरिश्चंद्र बिराजदार यांनी स्पर्धा संपताच दोघांना बोलवून घेतले आणि राहुल भविष्यातील दुसरा काका पवार होणार, असे भाकीत केले. काका पवार यांनी कुस्तीत ३२ पेक्षा जास्त पारितोषिके मिळवून इतिहास नोंदवला आहे. बिराजदार यांनी राहुलची सर्व जबाबदारी घेऊन त्याला पुण्यातील गोकुळ तालमीत दाखल केले. तालमीतील शिस्त, तांत्रिक मार्गदर्शन, खुराक, सराव यामुळे राहुलच्या खेळाला आकार मिळाला आणि त्याने मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील कुस्त्यांचे फड गाजवत आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्येही भल्याभल्या मल्लांना लोळवले.

राहुलचा भाऊ गोकुळ आणि वडील बाळासाहेब यांनी राहुलच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. तर पाटोदा शहरासह जिल्हाभरात जागोजागी फटाक्यांची आतषबाजी करुन राहुलच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

दिल्लीच्या राजकारणातून रोखले होते २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेत जाण्यासाठी दिल्लीतील अंतर्गत राजकारणातून राहुलला रोखण्यात आले होते, याची सल राहुलसह सर्वाच्या मनात होती. या पाश्र्वभूमीवर यावर्षीच्या स्पर्धेत राहुलने भारताला कुस्तीतील पहिलं सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

आई-वडिलांचा सत्कार

राहुलने सुवर्णपदक मिळवल्यानंतर पाटोदा येथील नागरिकांनी राहुलचे वडील बाळासाहेब आवारे आणि आई शारदा यांचा सत्कार केला, तेंव्हा मुलाने आपल्या कष्टाचे चीज केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.