‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून देशात वाद सुरू आहे. भाजपाशासित राज्यात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले, जितेंद्र आव्हाड?

“‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. अधिकृत महिलांचा आकडा ३ आहे, तरी ३२ हजार करून दाखवण्यात आला. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे,” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

दरम्यान, त्यापूर्वी ट्वीट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपटाने हा खोटारडेपणाचं परमोच्च स्थान गाठलं आहे. केरळची सत्य परिस्थिती वेगळीच आहे. विदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे, त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. गेल्यावर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले होते. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे, भारताचा ७६ टक्के आहे.”

“बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के, आसाममध्ये ४२ अन् उत्तर प्रदेशमध्ये…”

“केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या ०.७६ टक्के आहे. देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या २२ टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के आहे. आसाममध्ये ४२ टक्के तर, उत्तर प्रदेशमध्ये ४६ टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या ७ टक्के अधिक आहे,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

हेही वाचा : द केरला स्टोरी’बाबत दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “चित्रपट बघितल्यानंतर एका मुलाने मला…”

“तीन महिलांची कथा ३२ हजार महिलांची म्हणून दाखवली!”

“त्या चित्रपटामध्ये ३२ हजार महिलांची कथा सांगितली गेली. त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा निर्माता म्हणाला की, ही कथा फक्त तीन महिलांची आहे. चित्रपट चालण्यासाठी ३२ हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला-भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला-भगिनी मूर्ख आहेत, त्यांना काही समजतच नाही, त्या वाटेल तशा वागतात असं प्रदर्शित करायचं,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story producer hanging in public say ncp mla jitendra awhad ssa