चिन्मय पाटणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यंदा अचानक विद्यार्थिसंख्या का वाढली, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.

राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची (सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्जनोंदणी प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. दर वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थी, तर बारावीसाठी सुमारे १४ लाख ६० हजार विद्यार्थी नोंदणी करतात. गेल्या वर्षी दहावीच्या १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

हेही वाचा >>>विद्यार्थी आंदोलनांवर टाच आणणारी प्रस्तावित कार्यपद्धती स्थगित; विद्यार्थी संघटनांशी चर्चेनंतर विद्यापीठाचा निर्णय

या पार्श्वभूमीवर यंदाच्या नोंदणीमध्ये विद्यार्थिसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात दहावीची विद्यार्थिसंख्या १६ लाख १० हजार जास्त, तर बारावीची विद्यार्थिसंख्या १५ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. तसेच अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी आणखी मुदत असल्याने विद्यार्थिसंख्येत भरच पडणार आहे. त्यामुळे दर वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थिसंख्या का वाढली, त्या मागे अन्य काही विशेष कारणे आहेत का, याचा अभ्यास राज्य मंडळाकडून करण्यात येत आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपूर्वी दहावीचे मूल्यमापन शाळास्तरावर करण्यात आले होते. त्यामुळे निकालात वाढ झाली होती. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थिसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. पण दहावीचे सुमारे २५ हजार विद्यार्थी वाढल्याचे दिसून येत आहे. ते का वाढले आहेत, याचा अभ्यास करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत परीक्षा पद्धतीमध्ये बदल प्रस्तावित करण्यात असल्याने खासगी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असू शकते.- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The maharashtra state board of secondary and higher secondary education will conduct the 10th and 12th examinations in february march pune print news ccp 14 amy
Show comments