सोलापूर : राज्यात चौथ्या क्रमांकाच्या मानल्या जाणाऱ्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपअंतर्गतच मुख्य लढत होत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोन्ही दिग्गजांना बाजूला सारून काँग्रेस पक्षाशी समझोता करून स्वतंत्र पॅनल उतरविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे माजी आमदार तथा बाजार समितीचे माजी सभापती दिलीप माने यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, वळसंगच्या स्वामी समर्थ शेतकरी सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, बाजार समितीचे माजी उपसभापती श्रीशैल नारोळे, हरीष पाटील, भाजपचे शहाजी पवार, अविनाश महागावकर आदींच्या उपस्थितीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेत निर्णायक भूमिका जाहीर केली. या वेळी भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांचीही उपस्थिती होती.
माजी सहकार व पणनमंत्री, आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आमदार सुभाष देशमुख यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात. या गुरूसह दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांना वगळून आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी मैत्रीचा निर्णय घेतल्यामुळे भाजपांतर्गत स्थानिक राजकारण चर्चेचा विषय ठरला आहे.
वार्षिक सुमारे १८०० कोटींची आर्थिक उलाढाल करणाऱ्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा १८ जागांसाठी तब्बल ४३९ उमेदवारीअर्ज दाखल झाले आहेत. येत्या २७ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी, उमेदवारीअर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात, येत्या १६ एप्रिल रोजी आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली पॅनल जाहीर होणार आहे. हा निर्णय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने घेतला असून, पॅनल उभे करण्यापासून ते सभापती निवडीपर्यंतचे सर्वाधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांनाच राहतील, असे आमदार कल्याणशेट्टी व दिलीप माने यांनी जाहीर केले.
या संदर्भात आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, की सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही पक्षीय स्वरूपाची नाही. आपल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३६ गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत आपण लक्ष घातले आहे. या निवडणुकीत आमच्याबरोबर जे येतील, त्यांना सोबत घेऊ. त्यात आमची काही अडचण राहणार नाही. आमदार कल्याणशेट्टी हे याबाबत जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील, असे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही स्पष्ट केले आहे. बाजार समितीचा कारभार करताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मदतीची गरज राहणार असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपअंतर्गत शह-प्रतिशहाचे राजकारण समोर आले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आमदार सुभाष देशमुख यांचे शिष्य मानले जात असले, तरीही त्यांनी महत्त्वाकांक्षेपोटी ‘गुरूची विद्या गुरूला’ शिकविण्याचे ठरविल्याचे सांगितले जाते. आमदार सुभाष देशमुख यांनी पुत्रप्रेमापोटी ज्यांना दूर सारले आहे, ते शहाजी पवार आणि अविनाश महागावकर हे सध्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या छत्रछायेखाली मोठे होत आहेत. या दोघांना सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही आमदार कल्याणशेट्टी यांनी सोबत घेतल्याचे दिसून येते.