उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं त्यातून गलिच्छ राजकारण दिसून आलं. महाविकास आघाडी स्थापन झाली त्यानंतर करोनाचं सावट होतं. त्यातही चांगलं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. लॉकडाऊन असल्याने बंधनं होती, गर्दी टाळायची होती तरीही खूप चांगलं काम उद्धव ठाकरेंनी केलं. मात्र नंतर ज्या प्रकारे त्यांना पायउतार व्हावं लागलं आणि गलिच्छ राजकारण झालं ते दुर्दैवी आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
लोकशाहीमध्ये दिलदारपणे विरोधकांशी पण चांगलं वागलं पाहिजे आणि विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांशी चांगलं वागलं पाहिजे ही यशवंतराव चव्हाण यांची जी शिकवण आहे त्या शिकवणुकीचा विसर पडलेला दिसला. कारण मी फोन करूनच यांना सुरतला पाठवलं, मी फोन करून गुवाहाटीला पाठवलं असं सांगितलं गेलं. जी राजकीय संस्कृती आहे त्याची तोडफोड करण्यात आली. पक्षांतर बंदी कायदे आणले गेले, नियम केले गेले त्या सगळ्याला तिलांजली दिली गेली हे आपण पाहिलं. निवडणूक आयोगही तारीख पे तारीख देत आहेत.सुप्रीम कोर्टाबाबत भाष्य करणं योग्य नाही पण तिथेही तारखाच पडत आहेत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या काही लपून राहात नाही. कोण कुणाला वेश बदलून भेटलं होतं ते आम्हाला माहित होतं. जूनच्या सुरूवातीला कुजबूज कानावर आली होती. मी त्यांना याची कल्पना दिली होती असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “भल्या सकाळी…”
एकदा निवडणूक झाल्यानंतर मतदार राजाने ज्यांना निवडून दिलं आहे त्यांनी व्यवस्थितपणे काम करावं. विरोधी पक्षाने त्यांचं काम करावं पण आम्ही विरोधी पक्षात कधी बसणारच नाही ही भूमिका जर कुणी घेतली आणि त्यासाठी तोडफोड करून सरकार पाडू हे आपण मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात पाहिलं हे जनतेला आवडलेलं नाही.
राजकीय जीवनात कोणत्या चुका केल्या? अजित पवार म्हणतात, “एक मोठी चूक वाटते की २००४ मध्ये…!”
शिवसेनेत फूट पडली ते लक्षात आलं होतं. आम्ही उद्धव ठाकरेंना ते सांगितलं. शरद पवार यांनीही त्यांना फोन केला होता. पण उद्धव ठाकरे म्हणायचे की माझा माझ्या आमदारांवर विश्वास आहे. त्यांना तसं वाटत होतं. पहिल्यांदा जो ग्रुप १६ जणांचा गेला त्यानंतरही सगळ्यांना एकसंध ठेवण्याची गरज होती तशी दाखवली गेली नाही. ज्यांना जायचं आहे त्यांनी जा थांबायचं त्यांनी थांबा असं वातावरण पाहण्यास मिळालं. आता याबाबत जास्त काय आहे ते त्या पक्षाचेच लोक सांगू शकतील. उद्धव ठाकरेंनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला तडा देण्याचं काम केलं गेलं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.