लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
अलिबाग – मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा १ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वात जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते, त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा कधी सुरु होणार याकडे येथील प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष असते.
हा मार्ग खुला होत असल्याने मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणार आहे. नऊ महिने अलिबाग मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार पंधरा लाखाच्या आसपास आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात.
हेही वाचा… उमदी शाळेतील विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकासह चौघे निलंबित; गुन्हा दाखल
दर अर्ध्यातासाने एक फेरीबोट मांडवा बंदरातून सुटते. गर्दीच्या वेळेला ही सरासरी वाढवली जाते. स्पीडबोट, रो-रो पेक्षा फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे, प्रदुषण, वाहतुक कोंडी यापासून सुटकाराम्हणून विशेषतः अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रवासी मुंबई-गोवा महामार्गावरुन किंवा इतरमार्गाने मुंबईला जाण्यापेक्षा अलिबाग,मुरुड मधील प्रवासी फेरीबोटीचा वापर जास्तीत जास्त करतात.
पर्यटकांचा सर्वात आवडता मार्ग
मुंबईतील पर्यटकांचा हा सर्वात आवडता मार्ग आहे. ऐतिहासिक गेटवे परिसराचा झगमगाट, प्रदुषण विरहीत जलप्रवास, प्रवासा दरम्यान सीगल पक्षांची संगत आणि जलवाहतुकीचा अनुभव लुटण्यासाठी मुंबईतील बहुतांशः पर्यटक स्वस्तात मस्त असलेल्या या मार्गाची निवड करतात. प्रवासादरम्यान १९ किलोमीटरचा अंतर कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे या मार्गाने पुन्हापुनः यावेसे वाटते. १ सप्टेंबर पासून हा मार्ग खुला होत असल्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला भरारी येईल, अशी आशा येथील पर्यटक व्यावसायिकांना आहे.
१ सप्टेंबरपासून मांडवा ते गेटवे ऑफ मुंबई हा मार्ग मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी खुला होणार आहे. खराब हवामानाचा जोपर्यंत अडथळा निर्माण होत नाही तोपर्यंत या मार्गावर दिवसा जलवाहतुक सुरु राहिल. फेरीबोट सुरु करण्यापुर्वी त्यांची डागडुजी, सुरक्षा साधनांची तपासणी करुन घेण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. – कॅप्टन सी.जे. लेपांडे, प्रादेशिक बंदर अधिकारी – रायगड