इमारतीला आग लागणे अथवा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळून होणाऱ्या घटनांमधील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी संकटमोचक बनून धाव घेणाऱ्या मुंबई अग्निशमन दलामध्ये तब्बल ७७४ पदे भरण्याच्या संदेशाने सध्या प्रसारमाध्यमांवर थैमान घातले आहे. केवळ मुंबईतीलच नव्हे तर गावखेड्यातील तरुणही या भरती प्रक्रियेबाबत विचारणा करू लागले असून अग्निशमन दलामध्ये नोकरी मिळविण्यासाठी बेरोजगार तरुणांची धडपड सुरू केली आहे. मात्र अग्निशमन दलाने सध्या पद भरतीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही. या खोट्या संदेशामुळे मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दल चक्रावून गेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अग्निशमन दलातील जवान स्वत: स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीच्या विळख्यात वा कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अग्निशमन दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांसह अग्निशामकांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे दलामधील रिक्त पदे भरावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई अग्निशमन दलामध्ये ७७४ अग्निशामकांची सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याचा संदेश प्रसारमाध्यमांवर फिरत आहे. मात्र हा संदेश खोटा असल्याचे समोर आले आहे.

संदेशात काय ? –

अग्निशमन दलातील ७७४ पैकी ९८ पदे अनुसूचित जाती, ६१ पदे अनुसूचित जमाती, २१ पदे विमुक्त जाती – अ, १२ पदे भजक्या जमाती – ब, २६ पदे भटक्या जमाती – क, १४ पदे भटक्या जमाती – ड, १७० पदे इतर मागासवर्गीय, १३ पदे विशेष मागास प्रवर्गासाठी, ३५८ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. तसेच महिलांसाठी ३० टक्के, माजी सैनिकांसाठी १५ टक्के, खेळाडूंसाठी पाच टक्के, मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पांतर्गत बाधितांसाठी पाच टक्के आणि भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के पदे राखीव आहेत. इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असल्याचे या संदेशात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर निवड पद्धती, शारीरिक मापदंड, पाठ्यवेतन, परीक्षेचे स्वरूप, मैदानी चाचणी, प्रमाणपत्र चाचणी आदींविषयी माहिती संदेशात नमुद करण्यात आली आहे. अर्ज आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह सरळ सेवा भरतीसाठी नेमून दिलेल्या दिवशी सकाळी ८ वाजता हजर राहण्याची सूचना त्यात करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात पूर्ण करण्यात येणार आहे.

संदेश खोटा –

भरतीचा संदेश मिळताच अनेक इच्छुक उमेदवार मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात मुंबई अग्निशमन दलातर्फे अग्निशामकांच्या भरतीचे नियोजनच करण्यात आलेले नाही. प्रसारमाध्यमांवरील या संदेशामुळे अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचारीही चक्रावले आहेत.

या खोट्या संदेशाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून त्याविरोधात आवश्यकती कायदेशीर कारवाई करण्याचा विचार प्रशासनाच्या पातळीवर सुरू असल्याचे मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The message of the firefighter recruitment process sent the fire department into a frenzy mumbai print news msr