देशातील प्रमुख दीपगृहाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्याचा निर्णय शिपिंग मंत्रालयाने घेतला आहे. याच योजनेंर्तगत मुंबईजवळील समुद्रात खांदेरी किल्ल्यावरील कान्होजी आंग्रे दीपगृहाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे. येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती शिपिंग मंत्रालयाचे राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी दिली. ते खांदेरी किल्ल्यावर पत्रकारांशी बोलत होते.
देशात १८० दीपगृह सध्या कार्यान्वित आहेत. हे दीपगृह मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. अनेक दीपगृह निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहेत. या दीपगृहांचे महत्त्व लोकांना कळावे, त्याचबरोबर इथला इतिहास आणि संस्कृती याचा अनुभव लोकांना घेता यावा, या उद्देशाने खांदेरी येथील कान्होजी आंग्रे दीपगृहाचा पर्यटन विकास केला जाणार असल्याचे देवरा यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळेलच. किल्ल्याच्या परिसराचेही संवर्धन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे देवरा यांनी सांगितले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया अलिबागजवळील मांडवा बंदर आणि थळ येथील बंदरातून किल्ल्यावर पोहोचता येणार आहे. यासाठी तीनही ठिकाणाहून पर्यटकांच्या सोयीसाठी लाँच वाहतूक सुरू केली जाणार आहे. पुढील सहा महिन्यांत प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर १८ महिन्यांत प्रकल्प कार्यान्वित केली जाणार असल्याचे देवरा यांनी सांगितले.
या वेळी शिपिंग विभागाचे सचिव प्रदीप कुमार सिन्हा हेदेखील उपस्थित होते. त्यांनी डीजीएलच्या माध्यमातून देशातील १५ दीपगृहाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ज्यापैकी तीन लाइट हाऊसचा या प्रकल्पात समावेश असणार आहे. प्रकल्पांतर्गत सध्या अस्तित्वात असणाऱ्या लाइट हाऊसची पुनर्रचना करणे, त्यांचे जतन करणे, लाइट हाऊसशेजारील परिसराची देखभाल दुरुस्ती करणे, पर्यटनाच्या अनुषंगाने आवश्यक सुधारणा करणे, किल्ल्याच्या भिंतीची देखभाल करणे यासारख्या घटकांचा समावेश असणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
या प्रकल्पासाठी साधारणपणे ३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे लाइट हाऊस विभागाचे महानिर्देशक कॅप्टन ए एम सूरज यांनी सांगितले. खांदेरी किल्ल्याबरोबरच गेट वे ऑफ इंडियाजवळील संक रॉक आणि डॉल्फिन लाइट हाऊसचाही या प्रकल्पांतर्गत विकास केला जाणार असल्याचे सूरज यांनी सांगितले. भारतातील निवडक लाइट हाऊसच्या पर्यटन विकासासाठी शिपिंग मत्रालयाने ३५० कोटींची योजना तयार केली असून, जुन्या दीपगृहाचे जतन या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader