सरकारने १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. अचानक हे अधिवेशन बोलावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
रोहित पवार ट्वीटमध्ये म्हणाले की, “इंडिया दिवसेंदिवस मजबूत होत असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महागाई , बेरोजगारी, सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती यांसारखे जनतेचे मूळ मुद्दे आता चर्चेत येत असल्याने लोकांना भाजपा सरकारचा खरा चेहरा कळायला सुरुवात झाली आहे.”
हेही वाचा >> सरकारने बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन, ऐन गणेशोत्सवात कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
‘परिणामी , गेली दहा वर्षे जनतेला गृहीत धरून चालणाऱ्या केंद्र सरकारला सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा साक्षात्कार झाला, येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करणे यासारखे अजून खूप सारे साक्षात्कार होतीलही”, अशीही टीका रोहित पवारांनी केली.
“निवडणुकांना जेवढा उशीर होईल, पराभव देखील तेवढाच मोठा होईल हे भाजपला कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांना सरकारचा खरा चेहरा समजण्यासाठी इंडिया अधिक मजबूत होण्यासाठी अधिकचा वेळ मिळू नये, यासाठी भाजपा प्रयत्नशील असून लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कदाचित त्यामुळेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज पडली असेल, हे नाकारता येणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी केली तारीख बदलण्याची मागणी
“१८ -२२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाविषयी नुकतीच माहिती मिळाली. या अधिवेशात अर्थपूर्ण चर्चा आणि संवाद होईलच. पण महाराष्ट्रात याच काळात गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे या तारखेबाबत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री विचार करतील”, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.