सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही मराठा आंदोलकांनी जाब विचारला. मोहोळ येथे हा प्रकार घडला.
मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून गेले दोन दिवसात राष्ट्रवादी शरद पवार गटाला लक्ष्य केले जात आहे. रविवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कुडूर्वाडी येथे मराठा आंदोलकांनी अडवत याबाबत जाब विचारला होता. पाठोपाठ बार्शी येथील मेळाव्यात आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा देत एकाने आत्मदहनाचाही प्रयत्न केला होता.
हेही वाचा >>>सातारा-लोणंद रस्त्यावर भीषण अपघातात दोन ठार, अपघातानंतर ट्रक पेटला
सोमवारी लगोलग दुसऱ्या दिवशी याच पक्षाचे अन्य एक नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाही मराठा आंदोलकांनी रोखत विचारणा केली. सोलापुरात राष्ट्रवादी गटाची शिव स्वराज्य यात्रा आली असता मोहोळमधील कार्यक्रम उरकून सोलापूरकडे मार्गस्थ होत असताना हा प्रकार घडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात यापूर्वी १५ वर्षे सत्तेत होता. अलिकडे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अडीच वर्षे राष्ट्रवादी भागीदार होता. या संपूर्ण काळात राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षणासाठी काय केले असा थेट प्रश्न या वेळी आंदोलकांनी विचारला. त्यावर डॉ. कोल्हे यांनी मराठा आरक्षणाला आपल्या पक्षाचा पूर्वीपासूनच पाठिंबा आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या या आंदोलनास आमचाच पाठिंबा असून याबाबत आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना आपण विचारू शकता, असे स्पष्टीकरण दिले.