वसई : बहुचर्चित नालासोपारा मतदारसंघात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून रंगलेले नाट्य अखेर रविवारी संपुष्टात आले. १३२ नालासोपारा मतदार संघात भाजपकडून राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सुमारे ५ लाख ९८ हजार मतदार असलेला नालोसापारा हा सर्वात मोठा मतदार संघ असून त्यात उत्तर भारतीयांचे मते सर्वाधिक आहेत. पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ.हेमंत सवरा यांनी याच नालासोपार्‍यातून ७१ हजार मतांची आघाडी घेऊन खासदारकी मिळवली होती. नालासोपारा मतदार संघात लोकसभेच्या वेळी उत्तर भारतीयांची मते निर्णायक असल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोघांचा यावर दावा सांगितला जात होता. त्यामुळे हा मतदार संघ मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली होती. भाजपाने संपूर्ण नालासोपारा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. भाजपाने पूर्वीपासूनच या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.

हेही वाचा…Sreejaya Chavan श्रीजया चव्हाण भाजपाकडून लढवणार निवडणूक, वडील अशोक चव्हाण म्हणाले, “आता तिला…”

नालासोपारा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक मोठ्या नेत्यांची नावे ही चर्चेत आली होती. तसे त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते. डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांचे याच मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते.तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी बविआ सोबत बंड करत भाजप मध्ये प्रवेश करून नालासोपारा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत माघार घेतली आणि त्यांचे बंड शमले.

रविवारी भाजपाच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी विधानसभा उमेवारांची पहिली यादी जाहीर केली. यात सर्वाधिक मतदार असलेल्या १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे नालासोपारा विधानसभा प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला.

हेही वाचा…भाजपनं आमदार अश्विनी जगतापांच तिकीट कापलं; दिर, शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर…

कोण आहेत राजन नाईक

राजन नाईक हे वसई विरार मधील भाजपचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून भाजप पक्षांच्या विविध पदावर काम केले असून शहराच्या राजकारणात सतत सक्रिय असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. तर शहरातील विविध समस्या याबाबत करण्यात आलेल्या आंदोलने यातही त्यांचा सहभाग होता. सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. तर २०१४ साली त्यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.