मागील काही दिवसांत यवतमाळ जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज सरासरी १० ते १५ रूग्णांची भर पडत असल्याने, आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. आता जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या ३५५ वर पोहचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज बुधवारी दिवसभरात १० नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यात यवतमाळ शहरातील तायडे नगर येथील तीन महिला आणि तीन पुरुष असे सहा जण आहे. तर नेर तालुक्यातील सिंदखेड येथील एक पुरुष आणि नेर शहरातील मालीपूरा येथील एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान येथील वैद्यकीय रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारानंरत बरे झालेल्या १३ करोनाबाधितांना आज सुट्टी देण्यात आली.

मंगळवारपर्यंत जिल्ह्यात उपाचार सुरू असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८६ होती. आज १३ रूग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यामुळे ही संख्या ७३ वर आली होती. मात्र आज पुन्हा १० रूग्णांची त्यात भर पडल्याने  रूग्णांची संख्या ८३ झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या १३० अहवालांपैकी १० पॉझिटिव्ह, तर अन्य १२० निगेटिव्ह आले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरणत कक्षात सध्या ११४ संशयित रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या ३५५ वर पोहचली आहे. यापैकी २५९ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे घरी परतले आहेत. तर आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

६ जुलैपर्यंत एकाही मृत्यूची नोंद नसलेल्या यवतमाळ शहरात, सोमवारी दोन वृद्धांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याने प्रशासन अधिक ‘अलर्ट’ झाले आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी विभागातील एक लिपिकही करोनाबाधित आढळला. त्यामुळे या लिपिकाच्या निकटच्या संपर्कातील अधिकाऱ्यांसह काही व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात येऊन विद्यार्थी विभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांची नेर येथे बैठक –
नेरमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी नेरच्या प्रतिबंधित क्षेत्राची आज बुधवारी पाहणी करून आढावा घेतला. येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे नमूने तातडीने तपासण्यासाठी पाठविण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागास दिले. नमुन्यांची तपासणी त्वरीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीने एक हजार ‘ॲन्टीजेन कीट’ उपलब्ध करून दिल्या. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लक्षणे असल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे कोटेकारपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of corona patients in yavatmal district is on 355 msr
Show comments