वर्धा मधील सेलू तालुक्यातील सालई शिवारात रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या संतोष उत्तम आडे या युवकाचा आज (बुधवार)सकाळी दहा वाजता अखेर मृतदेह आढळून आला. यामुळे जिल्ह्यात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या आता सातवर पोहचली आहे.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने प्रशासनाची झोप उडविली आहे. आठही तालुक्यात पुराने हाहाकार माजवला आहे. पवणूर येथे वनराई बंधारा फुटल्याने पवणूरसह खानापूर, कामठी ही गावे जलमय झाल्याने तेथील लोकांना मंदिरात हलविण्यात आले आहे. शंभरावर घरे पाण्याखाली आली आहेत.
विदर्भात पावसाचा रुद्रावतार; चंद्रपुरात इरई नदी कोपली, गडचिरोलीत पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी
नाल्यांना पूर आल्याने हिंगणघाट, येनोरा, समुद्रपूर, वर्धा, आंजी, पवणूर, मंडगाव, सुजातपूर, तळेगाव, आर्वी येथील मोठे मार्ग तसेच अन्य अनेक छोट्या रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सुजातपूर येथील अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. निम्न वर्धा व लाल नाला प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धोक्याची गंभीरता वाढतच चालल्याचे चित्र आहे.