एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : वाराणसीच्या काशी विश्वनाथ आणि तिरुपतीच्या बालाजी मंदिराच्या धर्तीवर सुमारे दोन हजार कोटींच्या खर्चाचा तीर्थक्षेत्र पंढरपूर विकास आराखडाच्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर व परिसराचा मोठा कायापालट होणार आहे. परंतु या विकास आराखडा राबविण्यास पंढरपुरातून व्यापारी व मिळकतदारांचा आतापासून विरोध होऊ लागला आहे. यात स्थानिक राजकीय नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून विरोधी सुरात सूर मिसळू लागल्यामुळे पंढरपूर विकास आराखडय़ाला आडकाठी येत आहे.
वाराणसीच्या विश्वनाथ मंदिर परिसराचा अलीकडे भरीव विकास झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच वाराणसीचे खासदार असल्यामुळे त्यांनी रस दाखविला आणि वाराणसीचा भव्य कॉरिडॉर प्रत्यक्ष कृतीत उतरला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाराणसीच्या धर्तीवर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास होण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आधिपत्याखाली प्रशासनाच्या पथकाने वाराणसी आणि नंतर तिरुपती येथे जाऊन तेथील विकास आराखडय़ाचे निरीक्षण केले. विकास प्रकल्पांची पाहणी केली. विशेषत: पुरातन मंदिरांच्या जपणुकीसह भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, वाहनतळ, रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत व्यवस्था आदी विविध पायाभूत बाबींची पाहणी करून त्यादृष्टीने तीर्थक्षेत्र पंढरपूरचा विकास करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवदेवतांची मंदिरे पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्ती, बळकटीकरण आणि सुशोभीकरण करून त्यांची प्राचीन स्थापत्य शैली जपण्यास मदत होणार आहे. यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह इतर छोटी-मोठी मंदिरे, तटबंदी, पडसाळी, दीपमाळा व इतर संबंधित कामे होतील. याशिवाय विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वायुविजन प्रणाली प्रसाधनगृहे, अग्निशमन यंत्रणा, भक्त सुविधा केंद्र आदी कामांचाही त्यात समावेश आहे.
शासनाकडून ठरल्यानुसार मिळणारा निधी वेळेवर उपलब्ध होईल किंवा नाही, याचा विचार करून पंढरपूर विकास आराखडा तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसराचा विकास होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांसह देशभरातून वर्षभरात सुमारे एक कोटी भाविक पंढरपुरात येतात. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार लहान-मोठय़ा यात्रांच्या कालावधीत लाखो वारकरी आणि भाविकांची मांदियाळी असते. यात्रा व इतर उत्सवांत दर्शन रांग पाच किलोमीटपर्यंत असते. दर्शनासाठी १६ ते १८ तासांचा आवधी लागतो. दर्शनरांगेत लाकडी कठडे, तात्पुरते पत्राशेड उभारले जाते. त्यासाठी मोठा खर्च होतो. अलीकडे दर्शनरांगेत छोटय़ा आकाराचा स्कायवॉक उभारण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेला पाच मजल्यांचा संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप ३५ वर्षांपूर्वीचा असून तो गैरसोयीचा आहे. भाविकांना पाच मजले चढणे-उतरणे शक्य नसल्यामुळे सध्या केवळ पहिल्या मजल्याचा दर्शनरांगेसाठी वापर होतो. त्यामुळे हा दर्शनमंडप पाडून तेथील ११ हजार चौरस मीटर जागेवर नवीन इमारत उभारली जाणार आहे. तेथे मंदिर समितीचे प्रशासकीय कार्यालय, सभागृह, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, पोलीस चौकी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी प्रतीक्षालय आणि विश्रामगृहाची कामे नियोजित आहेत.
मंदिर परिसर आणि लगतचा भाग अरुंद असल्यामुळे दर महिन्यात एकादशीसह यात्रा काळात भाविकांची प्रचंड दाटी होते. तेथील विद्युतपुरवठा कोणत्याही कारणांस्तव खंडित झाल्यास तेथे विद्युत यंत्रणेला तात्काळ पोहोचणे जिकिरीचे ठरते. भाविकांचीही चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडू शकते. पंढरपुरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या ३० हजारांपर्यंत असून दोन हजार वाहने येतात. त्याचा विचार करून ठिकठिकाणी वाहनतळा़ंची उभारणी विकास आराखडय़ात समाविष्ट आहे. तसेच पालखी मार्गावर विसावा परिसरात पंढरपूर नगर परिषदेच्या मालकीच्या आठ एकर जागेवर मालमोटार टर्मिनस उभारण्याचेही नियोजन आहे.
पंढरपूर शहरातील यमाई तलाव, पद्मावती व जिजामाता उद्यान व परिसर विकसित तथा सुशोभित होणार आहेत. चंद्रभागेकाठी घाट बांधण्याच्या प्रस्तावित कामापैकी मूळ आराखडय़ात वाळवंट परिसर सुधारणा, पुंडलिक मंदिर व विष्णुपद मंदिर परिसरात सुधारणा ही कामे मंजूर आहेत. ३३८ मीटर लांबीच्या घाटांचे काम पूर्ण झाले आहे. घाट विकासाची शिल्लक कामे व अन्य कामे प्रस्तावित आहेत. या माध्यमातून पूर नियंत्रण आणि नदीकाठी स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे. साधारणत: २२०० मीटर लांबीचा पायऱ्यांच्या टप्प्यामध्ये काँक्रीटचा घाट बांधण्याचे नियोजन आहे.
काळाची गरज :
हा विकास आराखडा राबविण्यात आल्यास अवघ्या पंढरपूरचा कायापालट होणार आहे, परंतु नव्या योजनेला विरोध सुरू झाला आहे. यापूर्वी १९८२ साली पंढरपुरात रमानाथ झा हे प्रांत असताना त्यांनी मोठय़ा कौशल्याने पंढरपूर शहरातील गजबजलेल्या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण केले होते. विशेषत: विठ्ठल मंदिर परिसरासह आसपासचा भाग विस्तीर्ण झाला होता. त्यावेळी स्थानिक व्यापारी व मिळकतदारांनी विरोध करूनही रस्ते रुंद झाले होते. आता ४० वर्षांनंतर वाढती लोकसंख्या, यात्रांमधील भाविक आणि वारकऱ्यांचा वाढता सहभाग, वाढती आर्थिक उलाढाल पाहता पंढरपूरचा आणखी विकास होणे ही काळाची गरज आहे. विकास झाल्यास त्याचा फायदा शेवटी पंढरपूरच्या व्यापारी आणि नागरिकांनाच होणार आहे.