देशांतर्गत मागणी वाढल्याने कांदा दराने सोमवारी दोन हजाराचा टप्पा ओलांडत या हंगामातील सर्वाधिक भावाची नोंद केली. कांद्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल २,३६१ रुपये असा विक्रमी भाव मिळाला. दोन दिवसांत कांद्याच्या दरात सुमारे ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याचे कारण त्यासाठी दिले जात आहे.
उन्हाळ्याबरोबर पावसाळ्याच्या प्रारंभीच्या दीड महिन्यात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असताना आता कांद्यानेही त्याच दिशेने मार्गक्रमण सुरू केल्याचे अधोरेखित होत आहे. शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस जिल्ह्यातील बहुतेक बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे सोमवारी नेहमीच्या तुलनेत कांद्याची अधिक आवक होऊन त्याचा भावावर परिणाम होईल, अशी बांधली जाणारी अटकळ फोल ठरली. लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू होताच कांद्याची प्रति क्विंटलला किमान १५०० ते कमाल २३६१ रुपयांनी विक्री झाली. सरासरी दर २२२५ रुपये राहिला. सोमवारी १५,०९० क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. दोन दिवसांपूर्वी हेच दर २००० हजार रुपयांच्या आसपास होते. इतर बाजार समित्यांमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल २३१९ रुपये असा विक्रमी भाव मिळाला. या ठिकाणी ४,५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक भाव असून त्यामुळे उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. देशांतर्गत बाजारात नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली आहे.