अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद अखेर न्यायालयात पोहचला आहे. याप्रकरणी अलिबागच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या २६ तारखेला होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
शहाबाज संघर्ष समितीतर्फे अॅड. असिम सरोदे, अॅड.प्रवीण ठाकूर व अॅड. श्रद्धा ठाकूर याचिकेचे काम पाहणार आहे. या याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या टी. आर. गलांडे, व्ही. बी. हमणे, ए. ए. कोळी व अलिबागचे तहसीलदार विनोद खिरोळकर यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
याचिकेमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने संघर्ष समितीच्या उमेदवारांना जाणीवपूर्वक ‘स्त्री सर्वसाधारण राखीव’ हे शब्द नसलेले फॉर्म पुरविल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर शेकापच्या उमेदवारांना मात्र ‘स्त्री सर्वसाधारण राखीव’ हे शब्द सुस्पष्टपणे दिसतील असे फॉर्म पुरविण्यात आल्याच नमूद करण्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे सुवर्णा हिराजी पाटील व सुरेखा नरेश म्हात्रे या समितीच्या उमेदवारांचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गामध्ये होऊन शेकापचे दोन उमेदवार मात्र ‘स्त्री सर्वसाधारण राखीव’ या प्रवर्गातून बिनविरोध निवडून आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
शहबाज ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या तीनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद होती, असेही या याचिकेत नमूद करण्यात आल्याचे नरेश म्हात्रे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा