रत्नागिरी: राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर आता सर्वच नेत्यांना उमेदवारीचे तिकीट मिळण्याचे वेध लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आजी-माजी आमदार विधानसभेच्या पुन्हा मैदानात असताना त्यांच्याबरोबर त्यांचे वारसदार देखील विधानसभा निवडणुकीसाठी बाशिंग बांधून तयार आहेत. या सर्वानाच उमेदवारीची प्रतिक्षा आहेत. तर राजकीय वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी आजी- माजी आमदारांनी देखील जोर लावला आहे. मात्र या निवडणुकीत कोणत्या नेत्यांचा राजकीय वारसदार पुढे आमदार होणार याकडे आता जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राजकारणातील घराणेशाहीवर नेहमीच चर्चा होत असते. मात्र आता या विधानसभेसाठी राजकीय वारसदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काही वारसदार प्रथमच आपले आमदारकीसाठी नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे या राजकीय वारसदारांची निवडणुकीची चर्चा आता जिल्ह्यात सर्वत्र रंगू लागली आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्वच राजकीय पक्ष व नेते तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी तर मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र या विधानसभेत इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यात आजी- माजी आमदारांचे वारसदार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. जिल्ह्यात म्हणावी तशी घराणेशाही नसली तरी या निवडणुकीत लोकांच्या पसंतीला आता ही घराणेशाही उतरणार का? याचे कुतूहल मतदारांमध्ये आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-मंडणगड-खेड, गुहागर चिपळूण, चिपळूण-संगमेश्वर, रत्नागिरी-संगमेश्वर, राजापूर लांजा- साखरपा असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील दापोली खेड मतदारसंघात योगेश कदम हे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत. तर भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटाचे, शेखर निकम अजित पवार गटाचे, उदय सामंत शिंदे गटाचे, राजन साळवी ठाकरे गटाचे असे एकूण पाच आमदार आहेत. सध्या हे सर्वजण विधानसभेसाठी मैदानात आहेत. या सर्वांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र आता जिल्ह्यात राजकीय वारसदार असलेली काही नेत्यांची मुलेसुद्धा आता या विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये दापोली-खेड-मंडणगड विधानसभेसाठी माजी आमदार रामदास कदम यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार योगेश कदम पुन्हा शिवसेना शिंदे गटाकडूनच उभे राहणार आहेत. याबरोबर गुहागर-चिपळूण मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव हेसुद्धा आपला मुलगा विक्रांत जाधव यांना राजकारणात वारसदार म्हणून पुढे आणताना दिसत आहेत. विक्रांत जाधव यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे विक्रांत जाधव हे ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात. मात्र त्यांना कोणता मतदारसंघ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या मुलासाठी गुहागर मतदारसंघ सोडण्याची देखील तयारी केली आहे. विक्रांत जाधव यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अनेक विकासकामे केली असल्यामुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे विक्रांत जाधव यांच्याबाबतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच माजी आमदार सुभाष बने हेसुद्धा आपल्या मुलाला राजकारणात आपला वारसदार म्हणून पुढे आणताना दिसत आहे. रोहन बने हेसुद्धा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून पदावर बसले होते. सध्या माजी आमदार सुभाष बने यांचे पुत्र रोहन बने यांचे नाव चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून चर्चेत आहे. सध्या या तीन राजकीय नेत्यांची मुले राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आली आहेत. मात्र यांचे राजकीय भवितव्य लवकरच जाहीर होईल अशी शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क असल्याने आमदार योगेश कदम यांना उमेदवारी मिळणार का? याकडे आता मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचेही नाव चर्चेत असल्याने या मतदारसंघातून कोणाला तिकीट मिळणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.