सांगली : पावसाच्या हलक्या सरीबरोबरच सोमवारी घरगुती गणेशाचे मोरयाच्या गजरात आगमन झाले. उद्यापासून सुरू होणार्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू असून गणेशमूर्ती विक्रीसाठी सांगलीतील जिल्हा बँकेसमोर स्टॉल लावण्यात आले आहेत. उद्यापासून गणेशोत्सवाला सुरूवात होत असतानाच यंदाच्या उत्सवावर दुष्काळाचे तीव्र सावट दिसत आहे. तथापि, प्रदीर्घ काळच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून हलयया पावसाची रिपरिप सुरू झाल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आज घरगुती गणेशाचे स्वागत करण्यात आले, तर उद्यासाठी श्रींची मूर्ती निश्चित करण्यासाठी बालगोपालासह गणेश भक्तांची जिल्हा बँकेजवळील स्टॉलवर गर्दी झाली होती. सुमारे ४० स्टॉल याठिकाणी उभारण्यात आले असून मूर्तीकारांनी वेगवेगळ्या रूपातील श्रींच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. उद्यापासून सुरू होणार्या गणेशोत्सवासाठी पूजेला लागणारे दुर्वा, आघाडा, पानसुपारी, फुले, नारळ या साहित्यासह सजावटीचे साहित्य खरेदीसाठी हरभट रोड, मारूती मंदिर चौक, मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसर आदी ठिकाणी नागरिकांची आज गर्दी झाली होती. यातच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने विके्रत्यांचीही साहित्य आच्छादन करण्यासाठी घाईही उडाली होती.