सातारा : गौरी आणि गणपतीसाठी विविध सुवासिक, तसेच देशी-परदेशी रंगबिरंगी फुलांची सजावटीसाठी गरज भासते. मात्र, यंदाच्या लांबलेल्या पावसाने फुलांच्या शेतात पाणी साचल्याने पाण्यात फुले कुजली. त्यामुळे ऐन सणात चांगल्या फुलांची वानवा तयार होत ती महागली आहेत.बाजारात सध्या झेंडू, शेवंती, जांभळी शेवंती, लाल बेंगलोर गुलाबाला विशेष मागणी असून, या फुलांची आवक घटल्याने दर दुप्पट झाले आहेत. ॲस्टर या गुलाबी रंगांच्या फुलांनाही तितकीच मागणी असून, सध्या या फुलाचे भाव आठशे रुपये प्रतिकिलोइतके चढे आहेत. मात्र, तरीही घरोघरी पूजेसाठी, तसेच हार बनवण्यासाठी या फुलांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. गोल्डन यलो आणि गोल्डन ऑरेंज जातीची झेंडू फुले ही सध्या तीनशे रुपये किलो दराने विकली जात आहे.
ऐन सणासुदीला उत्सवामुळे भाव गगनाला भिडले आहेत. सुवासिक सायली आणि कुंदा फुलांच्या गजऱ्यांनाही विशेष मागणी आहे. सध्या हे गजरे तीस ते पन्नास रुपये प्रति नगाने विकले जात आहेत. निशिगंधाचा भाव हजार रुपये प्रतिकिलो आहे.गौरी-गणपतीच्या हारासाठी फुलांना मोठी मागणी असते. यासाठी सातारा शहर आणि जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या फूलबाजारांना बहर आला आहे.निरनिराळ्या प्रकारच्या फुलांची मागणीनुसार मोठी आवकही होते. केवड्याचे पान, पाण्यातले कमळ, जास्वंद, गुलाब, गुलछडी, लिली, शेवंतीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. अनेक गणेश भक्त दर वर्षी फक्त फुलांची सजावट करीत असतात. या वाढत्या महागाईमुळे त्यांनीही सजावटीला मुरड घातली आहे.
पुणे, सांगली, सातारा आदी भागात झालेल्या पावसामुळे या वर्षी फूलशेतीवर परिणाम झाल्याने दर्जावर परिणाम झाला आहे. पाण्यामुळे फुलांच्या पाकळ्या चुरगळल्या आहेत. काही फुले कोमेजल्याने त्यांना मागणी कमी आहे. दर्जेदार फुलांचा पुरवठा कमी झाल्याने दर कडाडले आहेत.
बाजारामध्ये निरनिराळी फुले येत आहेत; परंतु बहुतांश फुलांचा दुय्यम आहे. पावसात भिजल्याने फुले लवकर खराब होत आहेत. त्यामुळे माझ्यासह किरकोळ विक्रेते हात राखून खरेदी करत आहेत. फुलांची आवक कमी झाल्याने भावही कडाडले आहेत.-नवनाथ पिसाळ, व्यापारी, सातारा