सातारा : ऐतिहासिक परंपरेने आलेली ओझर्डे (ता. वाई) येथील सोंगांची मिरवणूक हजारोंच्या उपस्थित मोठ्या उत्साहात झाली. गावातील लहानांपासून ज्येष्ठापर्यंतचे कलाकार मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात. सोंग म्हटलं, की आपल्यासमोर लोकनाट्य तमाशा, नाटक किंवा चित्रपट येतो, मात्र येथे असं काही नसतं. यामध्ये रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हुबेहूब व्यक्तिरेखा तयार करून त्याची मिरवणूक असते. अनेक वेगवेगळ्या विषयांनुसार कलाकारांनी आकर्षक वेशभूषा करून देखावे सादर केले जातात. हे देखावे पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह ओझर्डे गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ भल्या पहाटे तीन वाजल्यापासूनच गर्दी करतात.

या मिरवणुकीचे जिल्ह्यासह पंचक्रोशीला याचं मोठं आकर्षणच असतं. प्रतिवर्षी ओझर्डेत बावधन बगाडाच्या आदल्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून या सोंगांची वाजत गाजत मिरवणूक निघते. फार पूर्वीपासून सुरू असलेल्या या परंपरेत गावातील माळ आळी व साळ आळी यांच्यात सोंगांची स्पर्धा असते. प्रारंभी विविध पानाफुलांच्या कमानीची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केलेल्या रथामध्ये चेहऱ्यावर रंगरगोटी तसेच विविध पेहराव केलेले कलाकार विराजमान झाले होते. हे कलाकार ऐतिहासिक, सामाजिक, वैज्ञानिक, आरोग्य तसेच चालू घडामोडीवर आधारित विविध जिवंत देखावे सादर करून उपस्थितांची मने जिंकतात. चालू घडामोडींसह विविध माहितीपर पोस्टरच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे देखावे, तसेच कलाकारांची रंगरंगोटी, आकर्षक वेशभूषा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे यातील स्त्री पात्रेही पुरुष कलाकारच हुबेहूब करतात.

पूर्वी ही मिरवणूक कंदिलाच्या व मशालीच्या प्रकाशात बैलगाडीतून निघायची. आता ट्रॅक्टर ट्रॉली आणि इतर साहित्याचा वापर केला जातो. विद्युत रोषणाईसाठी विद्युत जनित्र (जनरेटर), आकर्षक पोशाखाचा वापर केला जातो. आकर्षक रथ तयार केले जातात. या मिरवणुकीसाठी गावातील बाहेरगावचे नोकरीनिमित्त, उद्योगांनिमित्त गेलेले सर्वजण उपस्थित राहून सहभाग घेतात. गावासाठी हा मोठा आनंदाचा उत्सव असतो. गावात सर्व राजकीय पक्ष कार्यरत आहेत. मात्र या उत्सवाच्या निमित्ताने एकमेकांतील राजकीय दुरावा आपोआप गळून पडतो आणि गावाच्या एकीला प्राधान्य दिले जाते.

मिरवणुकीची चुरस पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा तरुण, आबालवृध्द तसेच महिलांची मोठी गर्दी असते. दोन्ही आळीतील सोंगांची भेट ग्रामदैवत श्री पद्मावती देवीच्या मंदिरासमोर होताच दोन्ही मिरवणुकांचे हार देवीला अर्पण केले जातात. उपस्थितांचा एकच जल्लोष होतो. यानंतर सोंगांच्या मिरवणुकीची सांगता होते.