करोना रोखण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी आणि जनतेचीही आहे. टाळेबंदीतून सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत शिथिलता असा जावईशोध लावण्यापेक्षा जनतेचे प्रबोधन करुन करोनाचे उच्चाटन करता येणे शक्य आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी करोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात उदभवलेली परिस्थिती, उपाययोजना, टाळेबंदी आदींबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
करोना रोखण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी आणि जनतेचीही आहे. सगळं प्रशासन आणि डॉक्टर करतील म्हणून करोनाला सोडण्यात अर्थ नाही, तर सगळ्यांच्या योगदानाशिवाय करोना कमी होणार नाही. यापुढे जिल्ह्यात घरच्याघरीच विलीगीकरण करण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. अंदाजे एक किंवा दोन ऑगस्ट नंतर टाळेबंदीतून शिथिलता देण्यास जिल्हाधिकारी तयार आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेली चार महिने टाळेबंदी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असताना सातारा जिल्हाधिकार्यांकडून वारंवार लॉकडाउन जाहीर केला जात आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. मग फक्त सातारा जिल्ह्यालाच कोरोना संसर्गाचा धोका विशेष काही आहे काय? असे सांगत उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.
देशात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या महानगरांतही लाखो-हजारोंच्या संख्येने करोनाचे रुग्ण सापडले आहेत. असे असताना या शहरांमधील सर्व व्यवहार सुरळीत चालले आहेत. मग सातार्यातच टाळेबंदी कशासाठी आहे? सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हाताला काम नसल्याने लोक खाणार काय. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे. या दरम्यान कोरोना येणार नाही काय? तुम्ही जेवढे दाबून ठेवाल, तेवढ्या ताकदीने त्याचा विस्फोट होतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. याचा विचार करुन जिल्हाधिकार्यांनी आपल्या अधिकाराचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी करावा. सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीबांना प्रशासनाने मदत करावी. साताऱ्यात परिचारिका व विविध विषयाचे पारंगत डॉक्टरांचीही भरती होणार आहे, असंही जिल्हाधकारी बोलल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील वैद्यकिय व्यावसायिकांची विशेष बैठक निमंत्रित केली होती, या बैठकीत सखोल चर्चा होऊन जिल्ह्यात सातारा जिल्हा कोविड टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला, असल्याचेही खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.