राहाता : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय होण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप चालु आहे. यासंदर्भात अप्पर तहसिल कार्यालयाच्या संदर्भात शासन स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून,महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनीआज बुधवारी प्रसारमाध्यमांशी देत ज्यांच्याकडे मुद्दे राहीले नाहीत,ते आता जनतेला पुढे करून लढाई करीत असल्याचा टोलाही त्यांनी थोरात यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
शिवजयंती सोहळ्यानंतर लोणी येथे माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे म्हणाले की,अप्पर तहसिल कार्यालयाला स्थगिती मिळाल्याची बातमी ही अहील्यानगर जिल्ह्याची नसून सोलापूर जिल्ह्यातील अनगर या गावाची असल्याचा खुलासा केला.संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील अप्पर तहसिल कार्यालयाच्या संदर्भात भूमिका मांडताना विखे म्हणाले की,जनतेच्या सुविधे करीता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे.आश्वी बरोबरच घारगाव, साकूर येथे अप्पर तहसिल कार्यालय व्हावे आशी मागणी पुढे आली असल्याकडे लक्ष वेधून याबाबत ग्रामस्थांच्या असलेल्या भावनांचा कुठेही अनादर न करता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.महसूली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकर्याना सूचना देण्यात आल्या असल्याचे विखे म्हणाले.
अप्पर तहसिल कार्यालयावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलतांना विखे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता म्हणाले की,ज्यांच्याकडे कोणतेच मुद्दे राहीलेले नाहीत ते फक्त जनतेला पुढे करून अस्तित्वाची लढाई करून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. ज्यांनी वर्षानुवर्ष मक्तेदारी आणि दहशत निर्माण केली त्यांना जनतेन झुगारून दिले आहे.परभव पचवता येत नसल्यामुळेच अप्पर तहसिल कार्यालयाच्या विषयावर राजकारण केले जात असल्याची टिकाही विखे यांनी थोरात यांच्यावर केली.
शिर्डीतील गुन्हेगारीच समूळ उच्चाटन करण्याच काम सुरू असून, जादा दराने पूजेच साहीत्य विकणे हा सुध्दा गंभीर विषय आहे.फुल विकण्याचा अधिकार मंदीर परीसरात फक्त साईबाबा संस्थानच्या कर्मचारी पतसंस्थेला देण्यात आला आहे.अनाधिकृत विक्री होत असेल तर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिर्डीचे नाव बदनाम होवू नये म्हणून प्रत्येक दुकानाच्या बाहेर दरपत्रक लावण्यासाठी व लूटमार करणाऱ्यां विरोधात कारवाई करण्याच्या सुचना पालिका प्रशासनास आपण दिल्या आहेत. – राधाकृष्ण विखे जलसंपदा तथा पालकमंत्री