मराठा आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. सातव्या दिवशीही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं असून त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी मागणी सरकारकडून केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी, असा सल्ला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. शिवशक्ती परिक्रमेच्यानिमित्ताने त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मराठा समाजाच्या आंदोलनाच्या या परिस्थितीकडे फार चिंतेने पाहते. कोणताही राजकारणी एक मिशन घेऊन समाजातील सर्व लोकांना दिलेला शब्द पाळणारा असतो. मराठा समाजाची उद्विग्नता पाहून मला त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करावसं वाटतं. मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत, ही उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यासाठी न्याय प्रक्रियेत काय निर्णय होईल, यावर मुक्त चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे. जालन्यात जे घडलं त्याबाबत मी दुःख व्यक्त केलं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

ओबीसीतून आरक्षण मिळावं का?

“गेले दोन दशक मुंडे, भुजबळ, वडट्टीवार, नाना पटोले यांनी ओबीसी भूमिका मांडत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही. हा विषय संवैधानिक आहे. मराठा समाजाची मागणी स्पष्ट आहे. त्या मागणीवरचा आमचा पाठिंबाही स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सफल होऊ शकत नाहीय, कारण जे घटनेला शक्य आहे ते करणं आवश्यक आहे. उगीचच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देईल आणि तो शब्द अपूर्ण राहिला तर मराठा समाज आणखी उद्विग्न होईल”, असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी

“सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी. मायबापाची भूमिका ही प्रसंगी हळवी, प्रेमळ आणि कडक अशी असते. अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घ्यावी. सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांच्या मागणीचा विचार करून निष्पक्ष चौकशी करावी”, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तर, त्या पुढे म्हणाल्या की, “मराठा आरक्षणाविषयी सत्ताधाऱ्यांनी जी समिती नेमली आहे, कागदपत्र तयार केले आहेत. ते न्यायालयात टीकतील अशी भूमिका घ्यावी. ओबीसी आरक्षणाचा विषय आणि मराठा समाजाचा विषय वेगळा आहे. त्यामुळे या दोन्ही वेगळ्या विषयांना एकत्र करण्याची आवश्यकता नाही. तसंच, मराठा समाजाला ओबीसीबाबत अपेक्षाही नाही”, असंही मुंडे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The rulers pankaja mundes resolute stand on maratha reservation obc reservation was also mentioned sgk
Show comments