“सत्ता गेल्याचे सूतक जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर दिसत असून सत्तेविना ते कामच करु शकत नाहीत. शरद पवार कधी घरी बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो अशी त्यांच्या मनात घालमेल सुरु आहे.” अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवारी आयोजित समारंभात आमदार पडळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते.
इंग्रजांना तुम्ही घालवू शकता तर जयंत पाटलांना तुम्ही घालवू शकत नाही का? असा सवाल आमदार पडळकर यांनी उपस्थित समुदायाला केला. आज भाचा सोडला तर जयंत पाटील यांच्या मागे कुणीही नाही अशी टीकाही त्यांनी केली. जिल्हा बँकेत प्रचंड भष्टाचार झाला आहे. नोकर भरतीत देखील प्रचंड भष्टाचार झाला आहे. त्यामुळे बँकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी आम्ही मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे, असं पडळकरांनी सांगितलं.
हे चुलते-पुतण्याचे सरकार नाही –
“ शिंदे सरकारचा आज- उद्या विस्तार होईल. मात्र हे चुलते-पुतण्याचे सरकार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस जरी आता सरकार चालवत असले तरी ते दोघेही भारी आहेत. जयंत पाटील सत्तेच्या विरोधात काम करू शकत नाहीत.” असं म्हणत, “टेंभू योजनेला नागनाथ अण्णांचे नाव द्या”. अशी मागणीही पडळकर यांनी यावेळी केली.
दोन वाढपे व्यवस्थित वाढत असतील तर ४० जणांची काय गरज? – सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत म्हणाले, “महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार घालवून शहाजी बापू वाळव्याला आले. शहाजी बापूंच्यामुळे रांगडी भाषा सातासमुद्रापार गेली. शहाजी बापू शिवसेनेचे सरकार गेलं नाही, हे सेनेचेच सरकार आहे. स्टेजवरील दोन माणसं निश्चित मंत्री आहे, बापूंचे तर ओके आहे सगळे.” असे म्हणताच सभेत हशा पिकला. तसेच, “सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर ४० जणांची काय गरज आहे?” असा विनोदही यावेळी खोत यांनी केला.
लोक गाड्या आडव्या लावतात आणि… – शहाजी बापू पाटील
आमदार शहाजी बापू पाटील यांनी हातातला मोबाइल जेवढा चांगला, तेवढाच वाईट, असे म्हणत “या मोबाइलमधील एका वाक्याने जगभर पोहचण्याचं काम केलं. डोंगर, झाडी पार जगभर गेली. डोंगर-झाडीने मला जरा चांगले दिवस आले आहेत. पण अनेक ठिकाणी माझी पंचाईत देखील होत आहे. डोंगर, झाडीवाले आले म्हणत लोक गाड्या आडव्या लावतात आणि फोटो काढण्यासाठी एकच गर्दी होते. बाहेर आता पहिल्यासारखे फिरता येत नाही.” असं बोलून दाखवलं.