बारामती : ‘सरकार त्यांचं, सत्तेचा वापर त्यांचा’ हे पदवीधर आणि कसबा निवडणुकीत दिसून आले. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मला जी माहिती मिळाली त्यामध्ये देशाचे चित्र बदलत आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी पोटनिवडणुकीवर भाष्य केले. कसबा पोटनिवडणुकीमध्ये दोन ठिकाणी अधिक मते मिळाली आहेत. हा बदल आहे, तो पुण्यात होत आहे याचा अर्थ लोक वेगळय़ा विचाराच्या प्रक्रियेत आहेत, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्याच्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश आहेत, प्रधानमंत्री आहेत आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेताही. या सर्वाना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले गेले. हा लोकशाही मधील चांगला निर्णय आहे, अशा शब्दांत पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

कांद्याच्या प्रश्नावर सरकार अपयशी

दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर असताना मला शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिल्याची माहिती मिळाली. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेत नाही. आम्ही सत्तेत असतानाही कांद्याच्या बाजारभावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला आणि त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार याबाबत अपयशी ठरले आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The situation of the country politics is changing sharad pawar statement ysh