गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मातरविरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी तसेच हिंदू धर्मीयांवरील अन्याय, अत्याचारविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यात मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी मोर्चे निघाल्याचे दिसून आले आहे. लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणला जावा अशी प्रामुख्याने मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनीदेखील भूमिका मांडली आहे.
“लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याला तडा जात आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात राज्य सरकारने कायदा बनवावा आणि समस्त नागरिकांनी या कायद्याला समर्थन द्यावे.” असं शेलार यांनी ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
याचबरोबर, “मला आश्चर्य वाटतं निर्लिज्जपणाचा हा कळस आहे. आमच्या मुली, महिला, भगिनींवर जी काय माहितीसमोर येते आहे त्यातून स्पष्ट दिसतय, किंवा त्यातून आपण अर्थ काढू शकतो तो म्हणजे एका विशिष्ट वर्गाकडून रोज अन्याय अत्याचार होत आहेत. हिंदू मुली या लोकांना खेळाचं साधन वाटायला लागल्या आहेत का?, त्यांच्यावर अन्यायच करावा, असं वाटायला लागलं आहे की काय?” असा आशिष शेलार यांनी संतप्त सवाल उपस्थित केला.
याशिवाय, लव्ह जिहादच्या घटना सामाजिक बांधिलकीला, सामाजिक एकतेला आता बाधा निर्माण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा लव्ह जिहादच्या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतली आहे. इथपर्यंत थांबून चालणार नाही कायदा बनवावाच लागेल, माझं आवाहन असेल की राज्यातील समस्त नागरिकांनी त्या कायद्याला समर्थन द्यावं.”